लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या आवारात इमारत क्रमांक चार येथे रुग्णालयाचा बाहय़रुग्ण विभाग आहे. तळमजल्यावर दररोज सकाळपासूनच रुग्णांची येथे अक्षरश: रीघ लागलेली असते. नेहमीप्रमाणे गुरुवारी रुग्ण येथे आले पण त्यांचे स्वागत झाले इमारतीच्या प्रवेशद्वारावर लावलेल्या संपाचा इशारा देणाऱ्या ‘२ जुलै पासून डॉक्टरांच्या संपामुळे बाहय़रुग्ण विभाग बंद राहील’ या फलकाने.

लांबून आलेल्या रुग्णांची आणि नातेवाईकांची त्यामुळे निराशा झाली. काही जणांनी प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न केला, पण प्रवेशद्वारावरील एक महिला सुरक्षारक्षक आणि अन्य पुरुष सुरक्षारक्षक त्यांना अडवत होते. ‘आज डॉक्टरांच्या संपामुळे ‘ओपीडी’ बंद असल्याने परत जा’ असे सुरक्षारक्षकांकडून सांगण्यात येत होते. दुपारी एक ते दीडच्या सुमारास येथे मोठय़ा प्रमाणात रुग्णांची गर्दी झाली होती. यात लहान मुलांना घेऊन आलेल्या महिलांचे विशेषत: मुस्लीम महिलांचे प्रमाण अधिक दिसून आले. जेव्हा गर्दी वाढायला लागली आणि लोक आत जायचा प्रयत्न करू लागले तेव्हा उपस्थित महिला सुरक्षारक्षकाने एक सायकल आणून आत जायच्या मार्गावर आडवी उभी करून अडथळा निर्माण केला. ‘कोणीही येथे थांबू नका, डॉक्टरांच्या संपामुळे कोणत्याही पेशंटला तपासले जाणार नाही किंवा औषधे मिळणार नाहीत’ असे ही महिला सुरक्षारक्षक घसा खरवडून आलेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना सांगत होती.
रुग्णालयात दररोज वैद्यकीय प्रतिनिधी (मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह) येत असतात. गुरुवारी दुपारी येथे आलेल्या दोन/तीन वैद्यकीय प्रतिनिधींनाही सुरक्षारक्षकांनी ‘आज काही नाही’ म्हणून परतीच्या वाटेला लावले. निवासी/शिकाऊ डॉक्टरांच्या संपामुळे बाहय़रुग्ण विभाग बंद असला तरी अधूनमधून काही डॉक्टर्स आत जाताना आणि बाहेर पडताना पाहायला मिळाले. जे रुग्ण अगोदरच येथे दाखल झालेले आहेत, पण त्यांना रुग्णालयातच अन्य भागांत काही तपासण्या करण्यासाठी पाठविले होते, त्यांना मात्र त्यांची कागदपत्रे दाखविल्यानंतर इमारतीत सोडण्यात येत होते. लांबून आलेले रुग्ण, नातेवाईक, त्यांच्या हातात असलेली औषधे, डॉक्टरांनी दिलेली फाईल आणि डॉक्टरच संपावर गेल्याने ‘आता काय करायचे’असे भले मोठे प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन डॉक्टरांचा संप एकदाचा लवकर मिटू दे, असे म्हणत तेथून निघून जात होते..