तालुक्यातील टाकळीभान येथील एका महिलेस श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिल्याच्या निषेधार्थ या महिलेने रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली. पोलिसांच्या निषेधार्थ आज टाकळीभान गाव बंद ठेवण्यात आले.
टाकळीभान येथील सुशीला नागेंद्र कांबळे ही महिला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेली असता तिची तक्रार तर ऐकून घेतलीच नाही, पण तिचा नवरा व तिला विनाकारण तुरुंगात डांबले. पोलीस निरीक्षक कैलास फुंडकर यांनी तिला शिवीगाळ केली. ही घटना गावात समजताच आज सर्वपक्षीय कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. त्यांनी घटनेचा निषेध केला. भीमशक्तीचे संदीप मगर, शिवसेनेचे अनिल कांबळे, बाळासाहेब रणनवरे, काँग्रेसचे राजेंद्र कोकणे, माजी सभापती नानासाहेब पवार यांनी पोलिसांचा निषेध करत अन्यायग्रस्त महिलेला न्याय देण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांनी निवेदन स्वीकारले. गावक-यांच्या भावनेचा आदर पोलीस करतील असे त्यांनी या वेळी सांगितले. टाकळीभान येथे घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला.