टेंभूच्या पाण्यासाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यवहार बंद ठेवून आटपाडीकरांनी गुरुवारी जोरदार पाठिंबा दर्शविला.  बंद मुळे आटपाडीतील सर्व व्यवहार ठप्प झाले होते.
श्रमिक मुक्तीदल व समान पाणी वाटप व पाणी संघर्ष चळवळीच्या विद्यमाने तहसील कार्यालयासमोर गेले १५ दिवस धरणे आंदोलन सुरू आहे.  या आंदोलनात आनंदराव पाटील, अण्णासाहेब पत्की, मुरलीधर पाटील, अशोक लवटे, मनोहर विभुते आदी कार्यकत्रे सहभागी झाले आहेत.  गुरुवारी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बंदचे आवाहन करण्यात आले होते.  शांततेत बंद पाळण्यात आला.  गावातील सर्व व्यवहार, दुकाने, उपाहार गृहे आज बंद होती.
टेंभू योजनेची वीज जोडणी पूर्ण झाली असून येत्या तीन ते चार दिवसांत टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यात येण्याची शक्यता आहे.  मात्र मंत्र्याच्या पाणी पूजनाच्या हव्यासामुळे विलंब होण्याची शक्यता चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी व्यक्त केली.  या पाण्याचे पूजन सामान्य शेतकऱ्याच्या हस्ते व्हावे असेही त्यांनी सांगितले.