* व्यवहार थंडावण्याची चिन्हे   
* ग्राहक-व्यापारी दोघेही चिंतेत
साडेतीन मुहूर्तापैकी पूर्ण मुहूर्त समजली जाणारी अक्षय्य तृतीया दोन दिवसांवर येऊन ठेपली असताना एलबीटी विरोधातील ‘बंद’मुळे ग्राहकांबरोबरच व्यापाऱ्यांमध्येही नैराश्याचे सावट पसरले आहे. दुकाने बंद राहणार असतील तर या शुभ मुहुर्तावर खरेदी तरी करायची, अशी चिंता ग्राहकांना आहे.
अक्षय्य तृतीयेला खरेदीसाठी ग्राहकांची विविध दुकानांमध्ये गर्दी उसळते. या मुहुर्तावर केलेली खरेदी अक्षय्य म्हणजे चिरकाल टिकणारी असते, असा नागरिकांचा गाढ विश्वास आहे. सोने, चांदी, दागिने, भांडी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, जीवनोपयोगी वस्तू, कपडे, वाहन, फर्निचर, घर आदींची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते.
खिशाला परवडेल, अशा वस्तूच्या खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. बाजारपेठेत या दिवशी पाय ठेवायलाही जागा नसते, दुकानदारांना क्षणाचीही उसंत नसते. नामांकित सराफांनी तर यंदा सोने वा दागिने खरेदीवर आकर्षक योजनाही जाहीर केल्या आहेत. या दिवशी मोठय़ा प्रमाणात खरेदी अथवा नोंदणी होईल या आशेवर अनेक बिल्डर्स या मुहुर्ताची चातकासारखी वाट पहात असतात.
मात्र, सध्या स्थानिक संस्था कराविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. महाराष्ट्र शासनाने १ एप्रिलपासून स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी सुरू केली., त्याविरोधात व्यापारी संतप्त झाले आहेत.
 नागपूरसह संपूर्ण राज्यात व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. किराणा, कापड, इलेक्ट्रॉनिक्स, सराफा, लोखंड, भंगार, भांडी, लाकूड आदी सर्वच व्यापारी या आंदोलनात उतरले आहेत.
राज्यात व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारला आहे. इतवारी, गांधीबाग या प्रमुख बाजारपेठेसह सीताबर्डी, महाल, सदर, धरमपेठ आदी सर्वच भागातील दुकाने बंद आहेत. काही दुकानदार दुकाने उघडतात. मात्र, व्यापारी मिरवणुकीने जाऊन दुकाने बंद करावयास लावतात. बिग बाजार तसेच एम्प्रेस मॉल तृतीयपंथीयांना समोर करून बंद पाडले गेले. या ठिकाणी तसेच काही दुकानांवर दगडफेकीच्या घटनाही घडत आहेत.

सरकार हा कर रद्द करायला तयार नाही तर व्यापारीही त्याविरोधात लढत आहेत. त्यांनी आंदोलन उग्र केले आहे. या पाश्र्वभूमीवर अक्षय्य तृतीयेला खरेदी कशी होणार, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. व्यापाऱ्यांच्या बंदमुळे कोटय़वधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले आहेत. व्यापार बंदमुळे होणारे नुकसान व्यापारी सहन करीतच आहेत. अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर कोटय़वधी रुपयांची उलाढाल होते. ‘करो या मरो’च्या जिद्दीने व्यापारी आंदोलनात उतरले असल्याने ते यंदा हे नुकसानसुद्धा सहन करायला तयार आहेत. काहीही झाले तरी हटणार नाही, असे व्यापारी संघटनांनी आधीच जाहीर केले आहे.
असे असले तरी नुकसान सहन करायची ताकद अनेक व्यापाऱ्यांमध्ये नाही. बंदला पाठिंबा असला तरी किती दिवस दुकाने बंद ठेवायची, या विवंचनेत अनेकदुकानदार आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दुकाने उघडावी, असे वाटते. मात्र, केव्हा व्यापारी येतील आणि दगडफेक करतील, याची शाश्वती नसल्याचे अनेक दुकानदारांनी  अटीवर बोलून दाखविले.
मुळात एलबीटीचा प्रश्न अचानक आलेला नाही. विधिमंडळात या विषयावर चर्चा झाली होती, तेव्हा विविध लोकप्रतिनिधींनी कोणती भूमिका घेतली होती, याचा जाब त्यांना व्यापाऱ्यांनी विचारायला हवा, सरकारलाही व्यापाऱ्यांनी जाब विचारायला हवा, ग्राहकांना मात्र वेठीस धरू नये, असे सर्वच ग्राहक संघटनांचे मत आहे.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सराफा दुकाने, वाहनांच्या शोरूम तसेच बिल्डरांची कार्यालयेही उघडली तरी आंदोलनकारी व्यापाऱ्यांची ती लक्ष्य ठरण्याची दाट शक्यता लक्षात घेता यंदा होणाऱ्या खरेदी-विक्रीवर व्यापाऱ्यांच्या बंदचे सावट पसरले आहे.