जागेच्या वादात विरुद्ध गटाला मदत करतो म्हणून एका तरुणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर तलवारीने वार करून जखमी केल्याप्रकरणी सहायक सरकारी वकील व अन्य एका वकिलासह बाराजणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. गांधीनगर भागातील मॉडर्न प्रशालेजवळ सिटीबस थांब्यासमोर सकाळी ११.३०च्या सुमारास हा प्रकार घडला.
प्रवीण लक्ष्मण पोळ (वय ३०, रा. दहिटणे, सोलापूर) असे या हल्ल्यात जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक सरकारी वकील हरि एकनाथ जाधव (रा. पांजरापोळ चौक, सोलापूर) व माजी महापौर मनोहर सपाटे यांचे पुत्र अ‍ॅड. बाबासाहेब सपाटे (रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांच्यासह अंबादास एकनाथ जाधव, विनायक एकनाथ जाधव, नारायण एकनाथ जाधव, सुभाष शिंदे, सिद्धनाथ व इतर पाचजणांनी त्याच्यावर हल्ला केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. यातील जाधवबंधू हे मूळचे पत्रा तालीम भागातील राहणारे आहेत. पत्रा तालीम भागाचा शहर व परिसरात दरारा आहे.
जखमी प्रवीण पोळ याचा मेहुणा हरि बबलू जाधव व त्यांचे चुलत भाऊ हरि एकनाथ जाधव व इतर यांच्यात जागेचा वाद चालू आहे. या वादात प्रवीण पोळ हा बबलू जाधव यांना मदत करतो, याचा राग अ‍ॅड. हरि जाधव व त्यांच्या भावांना होता. त्यातून चिडून त्यांनी आपले भाचे अ‍ॅड. बाबासाहेब सपाटे यांच्यासह इतर साथीदारांच्या मदतीने पोळ यास एकटय़ाला गांधीनगर परिसरात गाठले. या सर्वानी त्यास बेदम मारहाण केली. या वेळी अ‍ॅड. हरि जाधव यांनी आपल्या हातातील तलवारीने प्रवीण पोळ याच्या डाव्या हातावर वार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, यासंदर्भात संपर्क साधला असता अ‍ॅड. जाधव व अ‍ॅड. सपाटे यांनी आपल्यावरील आरोप नाकारले आहेत. अ‍ॅड. हरि जाधव यांनी घटनेच्या वेळी आपण आपल्या लॉजमध्ये बसलो होतो. नंतर न्यायालयात कामकाजासाठी गेलो. केवळ पूर्ववैमनस्यातून खोटय़ा गुन्हय़ात आपणास गोवण्यात आले. पोलिसांनीही खातरजमा करून न घेता गुन्हा दाखल करून घेतल्याचे म्हटले आहे.