उसाला प्रतिटन २ हजार ८०० रुपये भाव दिल्याने संगमनेर कारखान्याला ऊस देण्यासाठी राहुरी तालुक्यात शेतक-यांची चढाओढ लागली आहे. त्यामुळे अन्य कारखान्यांना त्यांच्याबरोबर ऊस भावाची स्पर्धा करताना दमछाक सुरू झाली आहे. राहुरीच्या तनपुरे कारखान्याला उसाची टंचाई जाणवणार आहे.
जिल्ह्यात यंदा उसाची टंचाई आहे. कमी पर्जन्यमान व जायकवाडीला मागील वर्षी पाणी गेल्याने मुळा व भंडारदरा धरणांचे आवर्तन विस्कळीत झाले. त्याचा परिणाम ऊसलागवडीवर झाला. उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात घटले आहे. तालुक्यात वांबोरी येथील प्रसाद शुगर व राहुरी फॅक्टरी येथील तनपुरे साखर कारखान्याने गळीत हंगामाचा शुभारंभ केला. त्यातच राहुरीचा ऊस पळविण्यासाठी सुमारे ३० हून अधिक कारखाने या भागात उतारले आहेत. बहुतेक कारखान्यांनी राहुरी व राहुरी फॅक्टरी येथे कार्यालये सुरु केली आहेत.

मागील हंगामात अशोक कारखान्याने अन्य कारखान्यांना ऊस दिला होता. पण आता अशोकलाही उसाची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या करजगाव, चांदेगाव, ब्राह्मणगाव, पाथरे, दरडगाव, माहेगाव, लाख व जातप भागातील ऊस नेण्यासाठी त्यांची यंत्रणा कार्यरत आहे. शेतक-यांबरोबर करार करण्याचे काम सुरू आहे. साईकृपा कारखान्याने मागील हंगामात नेलेल्या उसाचे पैसे अद्याप अदा केलेले नाही. त्यामुळे त्यांना ऊस देण्यास शेतकरी अनुकूल नाहीत. विखे, संजीवनी, कोळपेवाडी, मुळा, अगस्ती, संगमनेर, विघ्नहर, गंगामाई, भीमाशंकर, अंबालिका, दौंड शुगर यांच्यासह सुमारे ३० हन अधिक कारखाने ऊस मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रसाद शुगरला ऊस द्यावा म्हणून युवा नेते प्राजक्त तनपुरे यांनी ब्राह्मणी, उंबरे भागात बैठका घेतल्या. तर माजी खासदार प्रसाद तनपुरे हे तनपुरे कारखान्याला ऊस मिळावा म्हणून कार्यकर्त्यांना साकडे घालत आहेत.
मागील वर्षी संगमनेर कारखान्याने राज्यात सर्वाधिक विक्रमी भाव दिला. त्यामुळे आता संगमनेरला ऊस देण्यासाठी उत्पादकांची चढाओढ लागली आहे. अनेक शेतकरी त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करून आमचा ऊस घेऊन जा, अशी विनंती करत आहेत. संगमनेर खालोखाल विखे, संजीवनी व कोळपेवाडी या कारखान्यांना ऊस देण्यास शेतकरी अनुकूल आहेत. एकूणच यंदा ऊसटंचाई असल्याने कारखान्यांना ऊस मिळविताना भावाची स्पर्धा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.