देशातील वाढता दहशतवाद, नक्षलवाद, काश्मीरमधील छुपे युद्ध, ईशान्य भारताचे होणारे बांगलादेशीकरण हे देशातील अंतर्गत सुरक्षेला हानिकारक ठरणारे गंभीर प्रश्न सक्षम गुप्तचर यंत्रणा व जागरूक नागरिकच सोडवू शकतील, असा विश्वास ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केला.
स्वामी विवेकानंदांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अभाविप, विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बाहय़ आक्रमणे, अंतर्गत सुरक्षा आणि संरक्षण सिद्धता या विषयावर महाजन यांनी दृक्-श्राव्य माध्यमाद्वारे सुमारे सव्वातास विस्ताराने माहिती दिली. अध्यक्षस्थानी जिल्हा वकील मंडळाचे अध्यक्ष अॅड. अण्णाराव पाटील होते. व्यासपीठावर डॉ. राजेश पाटील, डॉ. एस. बी. सलगर, यशवंत जोशी उपस्थित होते.
विवेकानंद संस्कार संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त काढलेल्या बॅचेसचे (बिल्ले) महाजन यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. महाजन म्हणाले की, चीन वेगवेगळय़ा पद्धतीने भारताशी छुपे युद्ध करीत आहे. ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी भारतात येण्यापूर्वीच धरणे बांधून ते चीनमध्ये वळविण्याचा घाट घातला जात आहे. पाकला अणुभट्टी उभारण्यास मदत केली जात आहे. पाकिस्तानच्या शास्त्रज्ञांना संशोधनासाठी वेळ देण्याची गरज नाही. त्यांना चीनची मंडळी संशोधन पुरवत असतात. भारतात स्वस्ताचा चिनी माल पाठवून आíथक घुसखोरी केली जात आहे. िहदी-चिनी भाई भाई ही १९६५ च्या युद्धातील पंडित नेहरूंनी दिलेली घोषणा फसवी होती. आजही तीच स्थिती आहे. चीन भारताचा कधीच मित्र बनू शकणार नाही, हे महाजन यांनी ठासून सांगितले.
चीनने आपल्या सर्व सीमेपर्यंतचे रस्ते चौपदरी केले आहेत. त्या भागातील लोकांना फक्त १५ टक्के रस्त्याची गरज आहे. क्षणाधार्थ सीमेवर सन्य सज्ज ठेवता यावे, या साठीच चीनने या सुविधा तयार केल्या आहेत. याउलट भारताच्या सर्व सीमेपर्यंत सुमारे ५० किलोमीटर अंतरावरील रस्ते अजून तयार झाले नाहीत. आपले सन्य युद्धास सज्ज आहे. युद्धात ते यशस्वी होईल, याचीही काळजी करण्याचे कारण नाही. फक्त या स्थितीत युद्ध झाले तर रक्तपात मोठय़ा प्रमाणात होईल. बाहय़ सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षाही तितकीच महत्त्वाची आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये भुतान वगळता सर्व राष्ट्रे विरोधात आहेत. त्यामुळे बाहय़ आक्रमणापासून भारताला धोका आहेच, शिवाय अंतर्गत अशांतताही अधिक आहे. दहशतवाद, नक्षलवाद हे प्रश्न गंभीर आहेत. दहशतवादी कारवायांमध्ये जितके लोक मारले जातात, त्याच्या चौपट नक्षलवादात मारले जातात. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठीही सर्व स्तरावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. काश्मीरमधील दहशतवाद जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे काश्मीरसाठी आता विशेष पॅकेज देण्याची अजिबात गरज नसल्याचे ते म्हणाले. ईशान्य भारताचे होणारे बांगलादेशीकरण हाही गंभीर विषय आहे. आसामात सुमारे एक कोटी बांगलादेशी आहेत. या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही तर भविष्यात आसामचा मुख्यमंत्री हा बांगलादेशी राहील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. अंतर्गत सुरक्षेच्या प्रश्नासंबंधी गुप्तचर यंत्रणेने सक्षम काम केले पाहिजे. सर्व नागरिकांनी सदैव जागरूक राहिले पाहिजे, हेच या प्रश्नाचे उत्तर असल्याचे महाजन म्हणाले.
अरुण समुद्रे यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती दिली. नांदेड रस्त्यावरील विवेकानंद चौकात स्वामी विवेकानंदांचा लोकसहभागातून पूर्णाकृती पुतळा उभारला जाणार असल्याचे ते म्हणाले. अॅड. अण्णाराव पाटील यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. संतोष बीडकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. सूत्रसंचालन गोपाळ कुलकर्णी यांनी केले.