हिंदू व्देष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात शुक्रवारी कोल्हापुरात हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिवाजी चौकात झालेल्या निदर्शनावेळी नाईक यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
हिंदू देवतांचा अपमान करणारे, दहशतवादाचे उघडपणे समर्थन करणारे तसेच ब्रिटनसह काही देशात प्रवेशबंदी असलेले हिंदू व्देष्टे डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात वारंवार पोलिसांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही त्यांच्यावर कारवाई केलेली नाही. हिंदूंचे श्रध्दास्थान असलेल्या गणेशाची विटंबना केल्याप्रकरणी त्याच्यावर कोल्हापूर, अकोला येथे गुन्हा दाखल केला आहे. डॉ. नाईक याच्यावर कारवाई करावी, पाकिस्तानच्या क्यू टीव्हीवर तत्काळ बंदी घालावी, या मागणीसाठी शुक्रवारी शिवाजी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. हिंदू राष्ट्रसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पोवार यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. डॉ.नाईक यांनी हिंदूंच्या श्रध्दास्थानांवर आघात केला असल्याने त्यांना अटक होईपर्यंत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी हिंदू एकताचे प्रांत जिल्हाध्यक्ष दिलीप भिवटे यांनी मुस्लिम मतांसाठी झाकीर नाईक यांच्यावर राज्यकर्ते कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप केला. हिंदू जनजागरण समितीचे मधुकर नाझरे, बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष संभाजी साळुंखे यांचीही भाषणे झाली. आंदोलनात शिवाजी ससे, दयानंद कांबळे, अनिल सूर्यवंशी, नंदू सुतार, मधुकर सुतार, हिंदुराव शेळके, शिवानंद स्वामी आदी सहभागी झाले होते.