संदीप फाऊंडेशनच्या तंत्रनिकेतन पदविका महाविद्यालयात सोमवारी ‘ट्रॅडिशनल डे’ साजरा होत असताना काही संशयितांनी एका विद्यार्थ्यांवर तलवारीने हल्ला चढवून त्याची हत्या केल्यामुळे महाविद्यालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. या दिवसानिमित्त विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषेत आले होते. यावेळी संशयितांनी तलवारीने हल्ला चढविला. महाविद्यालय प्रांगणात घडलेल्या थरारक नाटय़ामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हल्लेखोरांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका विद्यार्थी व नातेवाईकांनी घेतल्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील महिरावणी येथे संदीप फाऊंडेशनचे हे महाविद्यालय आहे. सध्या महाविद्यालयात वेगवेगळे डेज् साजरे होत असून त्यात हा प्रकार घडल्याने विद्यार्थी हादरले आहेत. ‘ट्रॅडिशनल डे’ निमित्त अनेकांनी राजे- महाराजे, औरंगजेब वेगवेगळ्या वेषभूषा केली होती. त्यातील काहींनी नकली शस्त्रही सोबत बाळगले होते. यावेळी काही संशयितांनी रवींद्र बोरसेवर हल्ला चढविला. त्यात तो जागीच कोसळला. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. अचानक झालेल्या घटनेमुळे महाविद्यालय प्रांगणात एकच धावपळ उडाली. महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन गंभीर झालेल्या रवींद्रला जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले. तथापि, तत्पुर्वीच त्याचे निधन झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ‘ट्रॅडिशनल डे’ निमित्त महाविद्यालयात आलेला रवींद्र हा इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनचे शिक्षण घेत होता. गतवर्षी तो तृतीय वर्षांत एका विषयात अनुत्तीर्ण झाला. सध्या तो महाविद्यालयात शिक्षण घेत नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. हल्लेखोरांनी वापरलेले शस्त्र नेमके कोणते यावरून विद्यार्थी वर्गात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या म्हणण्यानुसार वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे शस्त्र हल्लेखोरांनी घेतले तर काहींच्या म्हणण्यानुसार हल्लेखोर सोबत शस्त्र घेऊन आले होते. पोलीस तपासात ही बाब स्पष्ट होईल, असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
मूळचा नांदगावचा असणारा रवींद्र खुटवडनगर भागात वडिलांसमवेत वास्तव्यास होता. या घटनेची माहिती समजल्यानंतर नातेवाईकांसह विद्यार्थ्यांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली.
या हल्ल्यास मागील काही वादाची किनार असल्याची चर्चा आहे. हल्लेखोरांना अटक केल्याशिवाय रवींद्रचा मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईक व मित्रांनी घेतली. यामुळे रुग्णालयाच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी सर्वाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
परंतु, कोणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यानच्या काळात महाविद्यालयाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच ज्या वेळी हा हल्ला झाला, त्याचे सीसी टीव्ही छायाचित्रणही पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी सांगितले.
हल्लेखोर हे महाविद्यालयाचे विद्यार्थी नव्हते. तरी ते महाविद्यालयात आवारात कसे आले याबद्दल बोलताना पाटील यांनी संस्थेचा परिसर २३५ एकर जागेत पसरला असल्याचे सांगितले. अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. सुरक्षारक्षक आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते, असे त्यांनी नमूद केले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.