ऐरोली सेक्टर १९ मधील व्हीपीएम इंटरनॅशनल शाळेमध्ये मंगळवारी फी न भरल्यामुळे काही विद्यार्थ्यांना शाळेत येण्यास मज्जाव करण्याचा प्रकार घडला. पोलिसांच्या मध्यस्थीने या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला, परंतु शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवत असणाऱ्या वर्गामध्ये बसू न देता एका बंद वर्गामध्ये बसून ठेवल्याने पालकांकडून यावेळी संताप व्यक्त करण्यात आला.
व्हीपीएम शाळेच्या १८ विद्यार्थ्यांनी शुल्क भरले नाही म्हणून त्यांना शाळेच्या आवारात घेतले नाही. त्यामुळे शाळेच्या बाहेर पालकांनी गदारोळ करण्यास सुरुवात केली. दोन वर्षांपूर्वीदेखील या शाळेने असाच प्रकार केला होता. तोच प्रकार मंगळवारी पुन्हा घडला. शिक्षणाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांनी शुल्क न भरल्यामुळे पालकांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून फी वसूल करावी, परंतु विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये अशी नोटीस पाठवली होती. असे असतानाही फी न भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळा प्रशासनाने शाळेत घेण्यास मज्जाव केला. यावेळी पालकही संतप्त झाले. त्यामुळे काही वेळ येथे तणावाचे वातावरण होते. पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर पालकांनी जबरदस्तीने विद्यार्थ्यांना दरवाजाखालून शाळेच्या आवारात पाठवले. परंतु शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बसू न देता दुसऱ्या वर्गात बसवून ठेवण्याचा प्रकार केला.

विद्यार्थ्यांची तीन वर्षांपासून फी थकबाकी आहे. पालकांना वारंवार फी भरण्यासाठी पत्र पाठवण्यात आले आहे. तरीदेखील फी भरण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून वर्गामध्ये बसू न देता एका रूममध्ये बसवण्यात आले आहे. पालक फी न भरता शाळा व्यवस्थापनालाच दोष देतात. शाळा व्यवस्थापन विद्यार्थ्यांना सर्व सुविधा देते, त्याबद्दल पालकांची तक्रारदेखील नाही. परंतु पालक फी भरत नसतील तर शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांना सुविधा द्यावयाच्या कोठून, याचा विचारही पालकांनी करावा.
-संध्या सिंदूर, मुख्याध्यापक, व्हीपीएम इंटरनॅशनल स्कूल