वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेली ब्रिटीशकालीन तहसील कचेरीची इमारत आणि नव्यानेच बांधण्यात आलेली सेतू कार्यालयाची इमारत पाडण्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. ही इमारत न पाडता सुशोभिकरण करून तिचे जतन करण्याची मागणी करीत त्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अमोल खताळ यांनी यासंदर्भात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. निवेदनाच्या प्रती वरिष्ठांनाही पाठविण्यात आल्या असून गेल्या तीन दिवसांपासून ही इमारत पाडण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीतील तहसीलदारांचे कार्यालय तात्पुरत्या काळासाठी यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात हलविण्यात आले असून इमारत पाडल्यानंतर तेथे नवे तहसीलदार कार्यालय बांधण्यात येणार आहे.
खताळ यांनी निवेदनात म्हटले आहे की, नव्याने बांधावयाच्या इमारतीच्या नावाखाली ब्रिटीशकालीन दगडी इमारती आणि नव्यानेच बांधलेल्या सेतू कार्यालयाची इमारत पाडण्यात येत आहे. जर तहसीलची इमारत बांधण्याचे प्रस्तावित होते तर सेतूची इमारत बांधून ती पाडण्याचे प्रयोजन काय, असा सवाल करीत यातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचे म्हटले आहे.
पाच वर्षांच्या आतच सेतूच्या इमारतीचे बांधकाम पाडले जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करीत ही बांधकामे न पाडण्याची विनंती खताळ यांनी केली आहे. या इमारतीचे जतन करावे, तसेच नव्यानेच बांधलेली सेतूची इमारत पाडू नये, अशी मागणी करीत यासंदर्भात आंदोलन करण्याचा इशारा दिला.