जेवढे त्यांचे वय आहे, त्यापेक्षा अधिक पुरस्कारांची संख्या ज्यांच्या नावापुढे आहे, ते नाव म्हणजे डॉ. युसुफखान महमदखान पठाण.  यु. म. पठाण या नावाचे मराठी साहित्यात वेगळेच गारुड आहे. तत्त्वज्ञान, प्रथा, परंपरा, संतांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन व त्यांचे साहित्य याचे गाढे अभ्यासक म्हणून यु. म. पठाण यांची ओळख आहे. ते सध्या आत्मचरित्र लिहीत आहेत. धर्म वा पंथ कोणताही असो, त्या परंपरेतले साहित्य आणि संतांची भूमिका त्यांच्या ओठी असते. कोणत्या कालखंडात कोणत्या संतांनी काय लिहिले, त्याचे सामाजिक अर्थ सांगतानाच त्या भाषेचा बाजही डॉ. पठाण सहजपणे उलगडून दाखवतात. आज ९ मार्च रोजी ते ८४ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत.
१९५३ मध्ये डॉ. पठाण सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयात अध्यापनाचे काम करीत. त्यानंतर १९७३ ते १९९० या कालावधीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक आणि मराठी विभागप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. पण महाराष्ट्रातल्या खेडय़ापाडय़ात संतसाहित्यावरचा अभ्यासक कोण, असे कोणत्याही धर्मातील व्यक्तीला विचारल्यास एकच नाव समोर येते, ते म्हणजे यु. म. पठाण. उर्दू, हिंदी, फार्सी आणि मराठी या सर्व भाषांची नस माहीत असल्याने त्यांनी वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करायला सुरुवात केली. महानुभाव पंथाचा त्यांचा अभ्यास मोठा आहे. ‘मराठी बखरीतील फार्सीचे स्वरूप’ या विषयावर त्यांनी १९५८ मध्ये पीएच.डी. मिळविली.
निवृत्तीनंतर पुढे ‘फार्सी-मराठी अनुबंध : भाषिक वाङ्मय आणि संस्कृती’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. वेगवेगळ्या वाङ्मयीन व साहित्य चळवळीशी त्यांचा दांडगा संपर्क आहे. त्यातूनच ‘फार्सी-मराठी व्युत्पत्ती कोश’ जन्माला आला. एके काळी फार्सी ही राजभाषा असल्याने त्यातील बहुतांश शब्द मराठीत आले. केवळ मराठी संतच नाही तर त्यांनी सुफी संतसाहित्यावरही प्रकाश टाकला.  
महानुभाव आणि सुफी साहित्याचा परस्पर संबंध, तत्त्वज्ञानाचे अर्थ ते सहजपणे सांगून जातात, द्वैत-अद्वैत सिद्धांत मांडणाऱ्या अनेक मराठी संतांची ओळख ते करून देतात. तसेच सुफी संतही समजावून सांगतात. शेख महंमद हे धारूर येथील संत वारकरी संप्रदायाशी कसे जोडले गेले होते, हे ते सांगतात. मराठवाडय़ातील बहुतांश मुस्लीम संतांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे.
निवृत्तीनंतर त्यांनी केलेले काम अधिक मोलाचे आहेत. १९९५ मध्ये ते झिम्बाब्वेला गेले होते, तेव्हा त्यांनी ‘शोना’ या  भाषेचाही अभ्यास केला. केवळ भाषाच नाही तर तेथील संस्कृती आणि राजकारणही ते सहजपणे सांगतात. मराठीच्या सर्वाग प्रगतीसाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम आयुष्यभर केले.
अभ्यासक्रमामध्ये कशी दुरुस्ती करावी, पीएच.डी. विद्यार्थ्यांना कोणते विषय द्यावेत, याविषयीही त्यांचे ठोस मत आहे. सरकारी कामकाजात त्याचा अंतर्भाव व्हावा, यासाठी ते प्रयत्न करीत असतात. भविष्यात संतपीठाचे काम अधिक गतीने व्हावे, अशी त्यांची इच्छा आहे.
यासाठी विविध धर्मातील संतांचे साहित्य पुढच्या पिढीपर्यंत नेता यावे म्हणून मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी काही पुस्तिका करणे आवश्यक आहे.  मूलत: संतपीठाचे काम विद्यापीठाचा भाग असू शकत नाही. त्यात अभ्यासक्रम हा दुय्यम आणि परस्पर सामंजस्याला अधिक महत्त्व असायला हवे.
तसा अहवाल राज्य सरकारला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर लिहिलेल्या विविध लेखांचे संकलन वेगवेगळ्या संतसाहित्याच्या अनुषंगाने केलेले चिंतन याचा अंतर्भावही त्यांच्या आत्मचरित्रात येणार आहे.
पद्मश्री डॉ. पठाण मराठी भाषेसाठी झटणारे आणि मराठीचा झेंडा देश-विदेशात फडकविणारे गाढे अभ्यासक मानले जातात.
मराठी संतांनी हिंदी भाषेत दिलेली शिकवण, मराठवाडय़ातील मराठी शिलालेख, मराठवाडी माणसे असे त्यांचे अनेक ग्रंथ मराठी वाचकांच्या संग्रही आहे. वयाच्या ८३ व्या वर्षीही ते मराठीच्या उन्नतीसाठी प्रयत्नशील आहेत.

sanjay raut
“मी त्याचक्षणी राजकारणासह पत्रकारिता सोडेन”, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; ठाकरेंचे खासदार नेमकं काय म्हणाले?
girish mahajan manoj jarange
“मनोज जरांगेंना माफी नाही, त्यांनी आता…”, गिरीश महाजनांचा टोला; म्हणाले, “त्यांच्या डोक्यात…”
Razmanama Mahabharata in Persian language
महाभारत संस्कृतातून फारसीत; अकबराच्या साहित्यिक आविष्काराबद्दल तुम्हाला माहितेय का?
नागपूर ‘एम्स’मध्ये अधिष्ठाता पदांच्या निकषांना छेद ! कायद्यात अशी आहे तरतूद..