शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या वयाच्या अटीमध्ये बदल करण्यात आल्याने मुंबईतील अनेक शाळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संबंधात शालेय शिक्षण विभागाकडून शाळांना कोणतेही आदेश न मिळाल्याने काही शाळांनी जुन्याच नियमांच्या आधारे प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. काही शाळा नव्या नियमांनुसार प्रवेश करीत आहेत, तर काहींनी सरकारचे आदेश आल्यानंतर प्रवेश करू, या विचाराने प्रवेश प्रक्रियाच पुढे ढकलली आहे.
सर्व शाळा प्रवेशासाठी वयाच्या निकषामध्ये समानीकरण करण्यासाठी ‘शिक्षण हक्क कायद्या’चा आधार घेऊन शालेय शिक्षण विभागाने पहिलीसाठी वयाची अट सहा पूर्ण हवे, अशी घातली. गेल्या वर्षी जुलै महिन्यात या संबंधातील घोषणा करण्यात आली होती. हा बदल २०१५-१६ च्या प्रवेशांपासून लागू होईल असेही तेव्हा स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, या संबंधात लेखी आदेश अद्याप शाळांना न मिळाल्याने त्यांच्यात वयाच्या अटीवरून संभ्रमाचे वातावरण आहे.
सध्या शिशुवर्गाकरिता (ज्युनिअर किंडरगार्डन) वयाची अट तीन आणि बालवर्गाकरिता (सीनिअर किंडरगार्डन) चार अशी आहे. याचा अर्थ चार वर्षांची मुले बालवर्गात आधीपासूनच शिकत आहेत. पण, नव्या नियमानुसार शिशुवर्ग आणि बालवर्ग या वर्गाकरिता वयाची अट अनुक्रमे चार आणि पाच अशी राहील. या निर्णयाचे दूरगामी परिणाम शालेय शिक्षण व्यवस्थेवर होणार आहेत. त्यामुळे काही शाळांनी सरकारचे आदेश येतील तेव्हा येतील, आतापासूनच टप्प्याटप्प्याने वयाची अट वाढविण्यास सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ वांद्रे येथील सेंट स्टॅनिसलस शाळेने या वर्षीपासून साडेतीन वर्षे पूर्ण असलेल्या मुलांना शिशुवर्गाला प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे, २०१६ पर्यंत शाळा चार वर्षे पूर्ण असलेल्या विद्यार्थ्यांला शिशुवर्गाला प्रवेश देऊ शकेल.
परंतु, काही शाळांनी सरकारकडून आदेशच न आल्याने संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच थांबविली आहे. आम्हाला लवकरात लवकर या संदर्भात परिपत्रक न आल्यास आम्ही प्रवेश प्रक्रिया सुरू करू, असे नवी मुंबईतील एका शाळेने सांगितले. काही शाळांनी तर कंटाळून प्रवेश अर्ज वाटण्यास सुरुवात केली आहे.

निर्णयाचे परिणाम
पहिलीला सहा वर्षांनंतर प्रवेश द्यायचा, ही सरकारची अट या वर्षीपासून लागू करायची ठरली तर या मुलांना आणखी एक वर्ष बालवर्गात काढावे लागेल. तसेच, जी मुले सध्या तीन वर्षांची आहेत, त्यांचा शिशुवर्गाचा प्रवेश एक वर्षांने पुढे ढकलला जाणार आहे.