यंदाच्या हंगामात पुन्हा उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीवर तोडगा काढण्यासाठी शासकीय पातळीवरून सध्या वेगवेगळ्या उपाययोजनांची आखणी करण्यात येत आहे. परंतु, त्यांचे स्वरूप नेहमीप्रमाणे तात्पुरते असल्याने हे संकट दरवर्षी उभे ठाकते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन नवजीवन स्कूलने दुष्काळाच्या समस्येवर सिन्नर तालुक्यापुरता का होईना, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याकरिता प्रश्नावलीच्या आधारे स्थानिक पातळीवरील पाणी व्यवस्था जाणून घेत काय काय उपाय करता येतील, याचा र्सवकष अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीने हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
धरणांचा जिल्हा म्हणून नाशिकची ओळख असली तरी येवला व सिन्नर सारखे काही दुष्काळी तालुकेही या भागात आहे. विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात एसईझेड व महाऔद्योगिक वसाहतीमुळे सिन्नर जगाच्या नकाशावर झळकत असले तरी तालुक्यात फेरफटका मारल्यास दुष्काळाने होरपळणारा परिसर पहावयास मिळतो. सगळीकडे रखरख व भकास वातावरण. दरवर्षी उन्हाळा आला की, पाण्यासाठीची वणवण ठरलेली. शहराला कसेबसे पाणी मिळत असले तरी ग्रामीण भागात पाण्यासाठी मात्र पायपीट करावी लागते. ही स्थिती लक्षात घेऊन नवजीवन डे स्कूलने दुष्काळावर कायमस्वरूपी शाश्वत उपाय करण्याच्या दिशेने हा उपक्रम सुरू केला आहे. प्रत्येक प्रश्नावर राजकीय लोकप्रतिनिधींनी तोडगा काढावा, ही प्रत्येकाची भाबडी समजूत. परंतु, त्यांच्या कामालाही काही मर्यादा आहेत.
सहा दशकात पाण्याचा प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे या प्रश्नाच्या मुळाशी जाऊन बंडींग, पाणी अडवणे, पाणलोट क्षेत्र वाढविणे, जुने तलाव जिवंत करणे, योग्य तिथे छोटे बंधारे आदी माध्यमातून दुष्काळाचे रडगाणे बंद करता येईल. पाण्याचा प्रत्येक थेंबाची साठवणूक केल्यास सिन्नर तालुका दुष्काळमुक्त करता येईल, असा विश्वास संस्थेचे सुभाष देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी संस्थेने विद्यार्थ्यांच्या मदतीने प्रथम गावनिहाय अभ्यास हाती घेतला आहे. त्याकरिता दहा प्रश्नांचा समावेश असणारी खास प्रश्नावली तयार करण्यात आली.
गावाचे नांव, सिन्नरपासून अंतर, पक्का रस्ता आहे किंवा नाही, बस सुविधा या बरोबर गावात कोणती पाणी व्यवस्था आहे, पूर्वी असणारी पण आता बंद असलेली पाणी व्यवस्था, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ यावर गावातील काम, जवळपास डोंगर-टेकडय़ा आहेत काय आदी माहिती संकलीत केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर, अत्यंत तातडीने सुटले पाहिजेत, असे कोणते प्रश्न आपल्याला वाटतात, हे जाणून प्रत्येक गावातील मुख्य समस्या लक्षात घेतल्या जाणार आहेत. गावात उत्साहाने काम करू शकणाऱ्या पाच व्यक्ती व भगिनींची नांवे नमूद करण्यास सांगण्यात आले आहे.
जेणेकरून, संबंधित गावातील समस्यांचे निराकरण करताना संबंधितांची मदत घेता येईल. भविष्यात सिन्नर तालुका सुजलाम् सुफलाम् करण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या उपक्रमात ग्रामस्थांनी सहकार्य करत सिन्नर तालुक्याची प्रतिमा बदलविण्यात हातभार लावावा, अशी अपेक्षा नवजीवन स्कूलने व्यक्त केली आहे.