पुरस्काराची अपेक्षा न बाळगता मराठी टक्का प्रशासकीय सेवांमध्ये कसा वाढेल, याचा ध्यास घेऊन ‘मिशन आयएएस’मधून आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा करून देण्यात आला.
आर्थिकदृष्टय़ा संपन्न असलेले अमरावतीतील डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमी मात्र, ५० रुपये शुल्क घेऊन, तर अकोल्यातील बाबुजी देशमुख वाचनालय मात्र एक रुपया घेऊन प्रशासकीय सेवेचा अभ्यास करण्यासाठी लागणारी पुस्तके, मार्गदर्शक आणि इतर सोयी उपलब्ध करून देतात. २४ तास संस्थेची दालने विद्यार्थ्यांसाठी खुली असतात. देशमुख वाचनालयात महाराष्ट्रातून आलेले ३०० विद्यार्थी नागरी सेवांची तयारी करीत आहेत. बाहेरगावाहून येणाऱ्या मुलींसाठी निवासाची सोय ग्रंथालयाचे सचिव अनुराग मिश्र लक्ष देऊन करतात. अमरावतीमधील अकादमीत आज १,१५० विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी आहे. महिन्यातील ३० दिवसांपैकी विद्यार्थ्यांनी २० दिवस वाचनालय किंवा अकादमीत उपस्थित राहणे सक्तीचे करण्यात आले असून तसे न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले जातात. अकादमी गेल्या १४ वर्षांपासून व्रत म्हणून प्रशासकीय सेवेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहे. त्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारची माहिती साठवून ठेवली नाही. सुरुवातीला तर विद्यार्थ्यांचे अर्जही भरून घेतले जात नव्हते, पण हल्ली अकादमीने सांख्यिकी ठेवण्यास सुरुवात केली आहे. अकादमी व वाचनालयातर्फे अनेक विद्यार्थी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, विक्रीकर निरीक्षक आणि इतर पदांसाठी निवडले गेले आहेत.
प्रशासकीय सेवेत जाऊ इच्छिणारे विद्यार्थी एकत्र अभ्यास व चर्चा करतात आणि यशस्वी होतात. त्यांना लाखो रुपयांची देणगी प्रशिक्षण वर्गात भरण्याची गरज पडत नाही. डॉ. काठोळे यांच्या मते, हल्ली स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र म्हणजे व्यापार झाला असून गरीब विद्यार्थी त्यामुळे नाडले जातात. आमच्या दोन्ही संस्था कधीही जाहिराती देऊन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. विद्यार्थ्यांना ज्याची आवश्यकता आहे त्याची २४ तासाच्या आत पूर्तता केली जाते. प्रशासकीय सेवेतील अधिकारी व तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र शासनाने स्वखर्चाने मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, नागपूर, अमरावती आणि अकोला येथे शासकीय आयएएस प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे.
त्याठिकाणी विनामूल्य आयएएसचे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांना विद्यावेतनही दिले जाते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी खाजगी प्रशिक्षण वर्गात जाऊन स्वत:ची फसवणूक करणे टाळावे. खामगाव आणि गुरुकुंजमोझरी येथेही मिशन आयएएस उभारण्याचा ७५ लाखाचा प्रकल्प आहे. यावर्षी युपीएससीमध्ये राज्यातून प्रथम आलेला विपीन इटणकर याला येत्या २७ जूनला व्याख्यानासाठी बोलावण्यात आले असून त्याचा व पत्नी शालिनीचा विमानाचा खर्च आणि इतर खर्चही ‘मिशन आयएएस’ अंतर्गत करण्यात येणार आहे.