अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाच्या बाहेरचे ३९ गुणांचे ३ प्रश्न विचारण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारल्याने विद्यार्थी, पालक आणि प्राध्यापकांनी संताप व्यक्त करत सर्व गुण देण्याची मागणी केली. आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभियांत्रिकीची परीक्षा सुरू झाली. इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन  या तीन विभागाच्या तिसऱ्या सेमिस्टरच्या गणित(मॅथेमॅटिक्स)-३च्या प्रश्नपत्रिकेत १३ गुणांचे तीन असे एकूण ३९ गुणांचे प्रश्न अभ्यासक्रमा बाहेरचे विचारण्यात आले. त्यामुळे प्रश्नपत्रिका हाती आल्यावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. केंद्रप्रमुखांना या संदर्भात विद्यार्थ्यांनी सूचना केली; परंतु विद्यापीठच याबाबतीत योग्य भूमिका घेईल, असे उत्तर त्यांनी विद्यार्थ्यांना देण्यात आले.  
विद्यापीठाच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थ्यांना बसला असल्याचे मत प्राध्यापकांनी व्यक्त केले असून अनेक महाविद्यालयेही विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी आहेत. या प्रकरणी विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांवरील पूर्ण गुण देण्याची मागणी करणार असल्याचे रामटेक येथील ‘किटस्’ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भास्कर पटेल यांनी सांगितले. वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांनीही दूरध्वनीच्या माध्यमातून अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नाला दुजोरा दिला.
याप्रकरणी अभियांत्रिकीचे ‘डीन’  रवींद्र क्षीरसागर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. विद्यापीठातील प्राध्यापक झोपेत पेपर काढतात का, असा संतप्त सवाल विद्यार्थी व पालकांनी विद्यापीठाला केला
आहे.     
परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांच्याशी संपर्क केला असता विद्यापीठाकडे ५ लेखी तक्रारी आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. हस्तलिखित प्रश्नपत्रिका प्रशासनाने पाहिल्या असता छापील व हस्तलिखित प्रश्न सारखे असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात संबंधित विषयाचे प्राध्यापक आणि अभ्यासमंडळ सदस्यांशी चर्चा करून माहिती घेतली जाईल, असे परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांनी सांगितले.