बी.एस्सी., बी.ए. अशा अनेक महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल मुंबई विद्यापीठाने रखडविल्याने हजारो विद्यार्थ्यांना भविष्यातील उच्च शिक्षणाच्या संधींवर पाणी सोडावे लागण्याची भीती आहे.
परीक्षा झाल्यानंतर जास्तीत जास्त ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करावा असा नियम आहे. मात्र काही मोजक्या परीक्षांचे निकाल वगळता विद्यापीठाला निकाल वेळेत लावण्यात बिलकुल यश येत नाही. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांवर होत आहे. उदाहरणार्थ, ‘बी.एस्सी.’चा निकाल न लागल्याने आयसर, टीआयएफआर आदी संस्थांमधील प्रवेशांवर विद्यार्थ्यांना पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या संस्थांच्या अभ्यासक्रमांकरिता अर्ज करण्याची मुदत एक तर उलटली आहे किंवा उलटण्याच्या मार्गावर आहे. पण गुणपत्रिका हातात नसल्याने विद्यार्थ्यांना या ठिकाणी अर्ज करणे शक्य झालेले नाही.
गेल्या वर्षी बी.कॉम.चा आणि बी.एस्सी.चा निकाल विद्यापीठाने ४५ दिवसांच्या आत जाहीर केला होता. यंदा बी.कॉम.चा निकाल जाहीर करायलाही विद्यापीठाला ५५ दिवस लागले. त्यानंतर गुणपत्रिका हातात पडायला आणखी दहा दिवस. याशिवाय एम.एस्सी., एम.कॉम. तसेच विधी, अभियांत्रिकी अशा अनेक अभ्यासक्रमांचे निकाल अजूनही लागायचे आहेत.
विद्यापीठ सर्व मिळून तब्बल ६३० परीक्षा दरवर्षी घेते. त्यापैकी एम.ए. आणि एम.एस्सी. भाग- १ची परीक्षा ४ एप्रिलला संपली; परंतु दोन महिने झाले तरी या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केलेले नाहीत. एम.कॉम.ची परीक्षाही याच दरम्यान संपली तरी अजूनही निकालाचा पत्ता नाही.
विद्यापीठाचे निकाल लांबणे हा दरवर्षीचाच शिरस्ता बनून गेला आहे. गेल्या वर्षी काही परीक्षांचे निकाल ४५ दिवसांत जाहीर करण्यात यश आले होते; परंतु गुणपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांना देण्यास विद्यापीठाने भलताच वेळ घेतला. दरवर्षी शिक्षक पेपर वेळेत तपासत नाहीत, असे कारण विद्यापीठातर्फे पुढे केले जाते. पण हे कारण किती वेळा विद्यापीठ देणार? निकाल वेळेत न लागल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरचे जे नुकसान होणार आहे ते विद्यापीठ भरून देणार आहे का, असा सवाल अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला.
‘लवकरच निकाल लावू!’
 बी.एस्सी.च्या पाचव्या सत्राचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. तसेच बी.एस्सी.च्या शेवटच्या आणि सहाव्या सत्राच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण केले आहे. या परीक्षेचा निकालही येत्या दोन दिवसांत जाहीर करू, असे आश्वासन परीक्षा नियंत्रक दिनेश भोंडे यांनी दिले. बी.एस्सी.ला (शेवटचे सत्र) १२ हजार विद्यार्थी बसले आहेत. एम.एस्सी.च्या निकालाला थोडा विलंब लागणार आहे, असे ते म्हणाले.