जिल्हा खाटीक समाज कल्याण संघाच्या वतीने गंजमाळ येथील रोटरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना जालन्याचे आ. संतोष सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
खाटीक समाज संख्येने कमी असला तरी समाजात परीश्रम करण्याची क्षमता असल्याने गुणी विद्यार्थ्यांनी समाजकारण, उद्योग, कला व क्रीडा यांसारख्या क्षेत्रातही प्रगती करण्याची गरज यावेळी आ. सांबरे यांनी व्यक्त केली. दीपप्रज्वलन आ. सांबरे, भरत सांबरे, विवेक उगलमुगले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शामराव चवळे, गणेश चव्हाण उपस्थित होते.
उगलमुगले यांनी ग्रंथ वाचनाचे महत्व आणि वाचक चळवळीत गुणी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सहभागी होऊन आपले तसेच समाजाचे मन उन्नत करावे असे आवाहन केले. भरत सांबरे यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संघातर्फे ठेंगोडे येथील माजी मुख्याध्यापक गोवर्धन तांदळे यांना ‘समाजगौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. समाजातील विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी करणाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. आभार संघाचे सचिव जगदीश परेवाल यांनी मानले. सूत्रसंचालन पूजा बिल्लोरे, अश्विनी चंदेल, कृतिका नावरे, ऐश्वर्या सांबरे, अश्विनी चवळे, शिवाजी परेवाल, रवींद्र चंदेल, महेंद्र किराड, योगेश तांदळे, यांनी केले. रोहिणी नागे, करण चव्हाण या गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले