महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपले वक्तृत्वगुण सिध्द करण्याकरिता आयोजित करण्यात आलेल्या लोकसत्ता वक्तृत्व स्पध्रेच्या नागपूर केंद्रावरील प्राथमिक फेरीला नागपुरातील उदयोन्मुम्ख वक्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाणी व विचारांची साथ घेऊन ४५ महाविद्यालयांतून आलेल्या तब्बल ८० स्पर्धकांनी विविध विषयांवर प्रभावीपणे मतप्रदर्शन करीत स्पध्रेत रंगत आणली.
अमरावती मार्गावरील सवरेदय आश्रमात आज सकाळी ९ वाजता स्पध्रेला प्रारंभ झाला. ज्येष्ठ विचारवंत डॉ. वि.स.जोग, प्रख्यात लेखक-वक्ते डॉ. कुमार शास्त्री, या राज्यस्तरीय स्पध्रेचे मुख्य प्रायोजक असलेल्या नाथे ग्रुप ऑफ पब्लिेकशन्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय नाथे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पध्रेचे परीक्षक सोनाली कोलारकर-सोनार तसेच सुशांत बल्लाळ, लोकसत्ताचे ब्युरो चीफ देवेंद्र गावंडे व वितरण उपमहाव्यवस्थापक वीरेंद्र रानडे हे देखील यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
‘लोकसत्ता’ हे वैचारिकतेच्या निकषावर महाराष्ट्रातील क्रमांक १ चे दैनिक असून मराठी वाचकांचे प्रबोधन करण्याचे काम लोकसत्ता प्रामाणिकपणे व जोरकसपणे करीत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वक्तृत्वसन्मुख करण्याचे काम ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ स्पध्रेच्या माध्यमातून लोकसत्ता करीत असून या स्पध्रेला थक्क करणारा प्रतिसाद मिळाला आहे.
वाणी व लेखणी ही कवचकुंडले आहेत व ती कोणत्याही इंद्राला विकायची नाहीत, हा पाठ विद्यार्थ्यांनी या स्पध्रेतूून गिरवावा, असा संदेश वि.स. जोग यांनी उपस्थित स्पर्धकांना दिला. भारताच्या ११ पंतप्रधानांपैकी पंडित नेहरू, लालाबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी व नरेद्र मोदी या पाच पंतप्रधानांना प्रभावी वक्तृत्वाचे धनी म्हणता येईल. कवी असलेले वाजपेयी अजोड व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.
सध्याच्या माध्यमांच्या दबावाच्या काळात आपले म्हणणे वैचारिक भूमिका न सोडता मोजक्या वेळेत मांडता यायला हवे.
पाठांतर व स्मरणशक्ती याही विषयांकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी दिला. प्रा. कुमार शास्त्री यांनी वक्तृत्व हा व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा पैलू आहे, असे सांगत विद्यार्थ्यांनी वाणीची शुध्दता व विचारांची स्पष्टता याकडे लक्ष द्यावे, असे मत व्यक्त केले. महाराष्ट्राला ज्ञानोबा ते विनोबा हा प्रबोधनकारी प्रवाह तसेच अत्रे, बाळशास्त्री हरदास ते राम शेवाळकरांपर्यंत अमोघ वक्तृत्वाची परंपरा लाभली आहे. वक्तृत्व ही कला आहे व ते एक शास्त्रदेखील आहे. वाचनातून तुमचे विचार घडत असतात.
अध्ययनशील वक्ता बनण्याचा प्रयत्न स्पर्धकांनी करावा. शब्द, आशय, अर्थ, विचार व कृतिशीलता यातून वक्तृत्व व कर्तृत्व घडावे, असेही शास्त्री म्हणाले.

लोकसत्ताने या स्पध्रेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या स्पध्रेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना वक्तृत्वकलेत सुधारणा करण्यासाठी एक दिशा मिळाली. धन्यवाद लोकसत्ता.
– सुजाता रमेश खोब्रागडे,     पी.डब्ल्यू.एस. महाविद्यालय, नागपूर</strong>

लोकसत्ताचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून वक्तृत्वाची आवड असलेल्या तरुणांसाठी ही एक चांगली संधी आहे. लोकसत्तेच्या दर्जेदार व्यासपीठावर नव्या वक्त्यांना आपले गुण सिध्द करावयास मिळत आहेत. लोकसत्ताने तरुणांना साद दिली अन् प्रतिसादही छान मिळाला आहे. हा उपक्रम असाच सुरू राहावा.
अंजली कुळकर्णी, पालक

श्रोत्यांसमोर बोलण्याचे धाडस विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी घेण्यात आलेली ही स्पर्धा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. स्पध्रेचे विषय प्रासंगिक आहेत. लोकसत्ताने लेखणीची गुणवत्ता जोपासून समाजातील बुध्दिवंतांना आपलेसे केले आहे. त्याचप्रमाणे तरुणांना बोलते करण्याचा हा उपक्रमदेखील लोकसत्तेच्या नावलौकिकास साजेसा आहे.
– डॉ. दीपक पवार, प्राध्यापक, वुमेन्स कॉलेज ऑफ आर्टस् अ‍ॅन्ड कॉमर्स,
    नवीन नंदनवन, नागपूर