News Flash

आरे वसाहतीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

आरे वसाहतीमधील महापालिकेच्या १६ क्रमांकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांंचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत. शाळेपर्यंत जाण्यासाठी धड रस्ता नाही यामुळे कोणतेही वाहन त्यांना शाळेच्या फाटकापर्यंत सोडत नाही.

| August 20, 2014 06:42 am

आरे वसाहतीतील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

आरे वसाहतीमधील महापालिकेच्या १६ क्रमांकाच्या शाळेतील विद्यार्थ्यांंचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत. शाळेपर्यंत जाण्यासाठी धड रस्ता नाही यामुळे कोणतेही वाहन त्यांना शाळेच्या फाटकापर्यंत सोडत नाही. इतकेच नव्हे तर बेस्ट प्रशासनाने सुरू केलेली बस सेवाही विद्यार्थ्यांंना मुख्य रस्त्यावरच सोडते. यामुळे गर्दीच्या वेळी तेथील महामार्ग ओलांडून शाळेत जाण्याचा धोका विद्यार्थ्यांना पत्कारावा लागत आहे.
आरे वसाहतीमध्ये महापालिकेची िहदी शाळा आहे. ही शाळा वस्तीपासून थोडी लांब व रस्त्यापासूनही आतल्या बाजूस आहे. यामुळे तेथून जाता-येताना विद्यार्थ्यांंवर बिबटय़ाच्या आक्रमणाचे प्रकार घडले आहेत. यामुळे पालकांच्या तक्रारीनंतर स्थानिक नगरसेवकाच्या पुढाकाराने बेस्ट प्रशासनाने विद्यार्थ्यांंना शाळेत ने-आण करण्यासाठी एक विशेष बस सेवा सुरू केली. यामुळे परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांंना दिलासा मिळाला. मात्र गेल्या एक महिन्यापासून ही बस सेवा विद्यार्थ्यांंना मुख्य रस्त्यापर्यंतच पुरविली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांंना ऐन गर्दीच्यावेळी रस्ता ओलांडून शाळेकडे जाणारी वाट धरावी लागते. हा महामार्ग सतत गजबजलेला असतो यामुळे लहान विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका पत्कारावा लागत असल्याची भीतीपालक व्यत करत आहेत. या शाळेपर्यंत जाण्यासाठीच्या रस्त्यावर खूप खड्डे आहेत तसेच रस्ताही खूप चिंचोळा आहे. यामुळे पावसाळ्याच्या काळात बस शाळेपर्यंत नेता येणार नसल्याची पूर्व कल्पना मुख्याध्यापक आणि शिक्षणाधिकारी यांना दिली होती, असा दावा बेस्टचे प्रवक्ते हनुमंत गोफणे यांनी केला. या रस्त्याच्या संदर्भात पालक संघटनेने प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधला असता, ‘तुम्ही आम्हाला मत देत नाहीत यामुळे आम्ही तुमचे काम का करावे,’ असा प्रश्न विचारला जात असल्याचे एका पालकाने सांगितले. तसेच येथील वस्तीमध्ये सर्व पक्षांचे पदाधिकारी केवळ निवडणुकांच्या वेळेत येतात. आम्हाला आश्वासने देतात पक्षाच्या प्रचार फेऱ्यांना सोबत घेऊन जातात.
मात्र नंतर तुम्ही आम्हाला मत देत नाही, असे म्हणून हात वर करतात असेही एका पालकाने स्पष्ट केले. या वसाहतीमध्ये दहा वर्षांपूर्वी एक रस्ता बनविला गेला. त्यानंतर येथे नवीन रस्ता तर सोडाच परंतु आहे त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे कामही कुणी केले नसल्याचेही रहिवासी सांगतात. गेल्या सहा दशकांपासून अस्तित्वात असलेल्या आरे वसाहतीतील या वस्तीला सध्या कुणीच वाली नसल्याचा केविलवाणा सूरही येथील रहिवासी आळवत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2014 6:42 am

Web Title: students in aarey colony in danger
टॅग : Danger
Next Stories
1 क्षयरोग मृत्यूंचे तथ्य तपासण्यासाठी पालिकेची मोहीम
2 परळ स्थानकात जलद गाडय़ांच्या थांब्याबाबत टोलवाटोलवी
3 घुमानमध्ये ‘मराठी तडक्या’चा ठसका!
Just Now!
X