नवी मुंबई विभागाच्या मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने तीनदिवसीय विज्ञान आणि गणिताची कार्यशाळा सानपाडा येथील विवेकांनद संकुलात नुकतीच आयोजित करण्यात आली. विज्ञान प्रयोग कार्यशाळेत शालेय अभ्यासक्रमावर आधारित पण दैनंदिन जीवनात या तत्त्वांचा कोठे उपयोग होतो हे दाखवणारे ३० प्रयोग मुलांना करावयास दिले होते. हवेचा दाब, न्यूटनचे गतीविषयक नियम, घनता, ध्वनीची पट्टी, रसायन विज्ञान या विषयांवर आधारित प्रयोग मांडलेले होते. तसेच खेळण्यामागील विज्ञान या कार्यक्रमात मुलांना खेळणी तयार करायला शिकवले. खेळणी तयार करताना त्यात वापरल्या जाणाऱ्या पदार्थाचे गुणधर्म लक्षात घेतानाच आपल्याला हवा तो परिणाम साधण्यासाठी साहित्याची मांडणी कशी करावी हे मुलांना शिकवण्यात आले.
गणिताची कार्यशाळामध्ये गणित हा कठीण विषय नसून सोपा आहे. ती एक पद्धत आहे. ती जर आत्मसात केली तर गणित आनंददायी आहे हे मुलांनी या कार्यशाळेत अनुभवले. गणितातली कोडी, सूत्र शोधणे, रामनुजनचा जादूचा चौरस, स्वत: गणित कोंडी तयार करणे इत्यादी गोष्टीमध्ये मुले रमून गेली. या कार्यशाळेत नवी मुंबई, ठाणे, रायगड, विरार, डोंबिवली, पनवेल आदी उपनगरांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.