के. जे. सोमैय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारच्या पृष्ठभागावर धावू शकेल अशी ‘एटीव्ही’ रेड शिफ्ट कार तयार केली आहे.
‘सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स’तर्फे होणाऱ्या ‘बाजा’ या राष्ट्रीय पातळीवरील आंतरामहाविद्यालयीन रेसिंग स्पर्धेत ही कार सहभागी होईल. युद्धभूमी, डोंगराळ भाग, शेती आदी कोणत्याही भूप्रदेशावर चालू शकेल अशी ही एकआसनी कार आहे.
उत्तम पॉवर ट्रान्समिशन, सर्व चाके लॉक करणारी ब्रेक यंत्रणा, न्युमॅटिक शॉक ऑब्सॉर्बर हे या कारचे वैशिष्टय़ आहे. बॉडीवर्कसाठी वापरण्यात आलेल्या ग्लास फायबरमुळे  ही कार देखणी झाली आहे. पेट्रोलवर धावणाऱ्या या कारला ३०५ सीसी इंजिन १० बीएचपी इंजिन वापरण्यात आले आहे.
या आधी अमेरिकेतील ऑबर्न येथे रेड शिफ्ट कार रेसिंगमध्ये उतरल्यानंतर टीमला रचनेसाठी २४वा क्रमांक देण्यात आला. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आलेली ही भारताची पहिलीच टीम होती. त्यानंतर २०१३मध्ये टीमने भारतात झालेल्या या स्पर्धेतही सहभाग घेतला. या कारचे सर्व भाग विद्यार्थ्यांनी स्वत: तयार करवून घेतले आहेत.
यंदाच्या बाजा स्पर्धेत १२० महाविद्यालये सहभागी होणार आहेत. यात रेड शिफ्ट कारचे मोटर, तांत्रिक इंधन, कार्यक्षमता आदींचे कौशल्य जोखले जाते. पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन प्रात्यक्षिकातून अनुभव घेण्याची संधी या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना दिली जाते.