सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी खासगी कंपन्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) उपक्रम राबवतात. त्यायोगे समाजातील अनेक गरजूंपर्यंत मदत पोहोचवली जाते. त्यामुळे आपली वस्तू बाजारात विकण्याचे कसब आणि समाजसेवा अशा दोन्हीचे धडे विद्यार्थी दशेतील तरुण कॉर्पोरेटर्सनाही दिले जातात. या धडय़ांचा भाग म्हणून पुढील आठवडय़ात मुंबईतील नामांकित व्यवस्थापन शिक्षणसंस्थांचे विद्यार्थी खेळणी विकण्याकरिता रस्त्यावर उतरणार आहेत.
मुंबईत ९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘महामंडी’ या उपक्रमाअंतर्गत जेबीआयएमएस, एनएमआयएमएस, वेलिंगकर्स, टीस्स, एसजेएमएसओएम (आयआयटी), के.जे.सोमैय्या, एसआयबीएम आदी शिक्षणसंस्थांचे तब्बल दीड हजार विद्यार्थी ही विक्रेत्याची भूमिका बजावणार आहेत. नीटी या व्यवस्थापन शिक्षण संस्थेतर्फे गेली नऊ वर्षे महामंडी या उपक्रमाचे आयोजन केले जाते आहे.
काय आहे महामंडी?
आपली वस्तू समोरच्याला कशी विकायची याचे धडे व्यवस्थापन शिक्षणसंस्थांमध्ये दिले जातातच. पण, महामंडी हा असा उपक्रम आहे की या धडय़ाचे प्रात्यक्षिक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विद्यार्थ्यांना देण्याची संधी मिळते. महामंडीचे आयोजन ‘नवनिर्मिती’ आणि ‘क्राय’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे केले जाते. नवनिर्मिती ही गरीब व वंचित मुलांच्या विकासाकरिता काम करते. या संस्थेच्या छत्राखाली या मुलांनी तयार केलेली खेळणी महामंडीत सहभागी होणारे विद्यार्थी रस्त्यारस्त्यावर उतरून विकतात. ही बहुतांश खेळणी शैक्षणिक स्वरूपाची असतात. भूमिती, बीजगणित, विज्ञान आदी विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणाऱ्या या खेळण्यांना म्हणून मुंबईकर पालकांकडून व मुलांकडून दरवर्षी जोरदार प्रतिसाद लाभतो. गेल्या वर्षी १२०० विद्यार्थ्यांनी तब्बल १४ लाख रुपयांची खेळणी विकली होती. खेळण्यांच्या विक्रीतून येणारा सर्व पैसा नवनिर्मितीला दिला जातो.

या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हाला समाजसेवेबरोबरच ग्राहकाची वर्तणूक, विक्री, सादरीकरण, परस्परसंबंध आदीही शिकण्याची संधी मिळते. गेल्या वर्षी १२०० विद्यार्थ्यांच्या मदतीने आम्ही तब्बल १४ लाख रुपये कमावले होते. यंदा ही रक्कम आम्ही १८ लाखांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न राहील.  
रजत श्रीवास्तव, महामंडी आयोजक