शहर स्वच्छतेसाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होणे आवश्यक असून त्यासाठी महानगरपालिका आणि जेसीआय पंचवटी होली सिटी यांच्या वतीने ‘स्वच्छ नाशिक अभियान’ अंतर्गत जनजागृती फेरी काढली.
डोंगरे वसतिगृह मैदानापासून सुरू झालेल्या या फेरीत अशोका एज्युकेशन स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च, अशोका कॉलेज ऑफ एज्युकेशन, एचपीटी महाविद्यालय, अण्णासाहेब पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय, एमजीव्ही हॉटेल मॅनेजमेंट आदी महाविद्यालयांनी सहभाग घेतला. एमजीव्ही हॉटेल मॅनेजमेंट व अशोका महाविद्यालयाच्या वतीने पथनाटय़ातून उपस्थितांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला. याप्रसंगी आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू अरुण जामकर उपस्थित होते. नाशिकची स्वच्छता व नाशिककरांची मानसिकता बदलण्यासाठी विद्यार्थी काम करीत आहेत. परदेशातील स्वच्छता, परदेशात राहणाऱ्या भारतीयांची आणि भारतात राहणाऱ्या नागरिकांमध्ये असलेल्या मानसिकतेमधील फरक त्यांनी स्पष्ट केला. नागरिकांमध्ये जागरूकतेसाठी जेसीआय पंचवटी होली सिटीने आयोजित केलेली स्वच्छ नाशिक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याचेही जामकर यांनी नमूद केले. सूत्रसंचालन जेसीवीक अध्यक्षा माधवी रहाळकर यांनी केले. अध्यक्ष कौस्तुभ मेहता यांनी प्रशिक्षण, व्यवस्थापन व समाजाभिमुख उपक्रमांसाठी जेसीआय हे ध्येयप्रेरित युवकांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ असल्याचे सांगितले. परिचय ऊर्मी झालावत यांनी करून दिला.