कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या सुधारीत नियमावलीत काही जाचक अटी लादल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी झाले असून या तरतुदी त्वरित रद्द कराव्यात, या मागणीसाठी बुधवारी सकाळी मविप्र शिक्षण संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर शेकडो विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जाचक अटी रद्द करण्याची मागणी केली. दैनंदिन तासिकांवर बहिष्कार टाकून त्यांनी निषेध नोंदविला.
चार वर्षांच्या कृषी पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या निर्णयामुळे भरडले जाणार असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. पदवी अभ्यासक्रमाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना आता सातव्या सत्रात नोंदणी करण्यासाठी १ ते ७ सत्रातील संपूर्ण विषयात उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे सहा व सातव्या सत्रातील काही विषय राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांना सातव्या व आठव्या सत्रासाठी नियमित नोंदणी करता येणार नाही असे नोटीसीद्वारे सूचित करण्यात आले आहे. तरतुदीत अचानक बदल झाल्यामुळे सहाव्या व सातव्या सत्रात काही विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांना जे लाभ मिळत होते ते बंद झाले. उपरोक्त सत्रात एखादा विषय राहिला तरी अंतिम सत्रात तो उत्तीर्ण करण्याची संधी मिळत असे. कृषी विद्यापीठाने विद्यार्थ्यांची ही संधी हिरावून घेतल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली. सुधारित जाचक अटींमुळे यंदा सहाव्या अथवा सातव्या सत्रात एखादा विषय अनुत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील सत्रात प्रवेश मिळण्याचे मार्ग बंद करण्यात आले. या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी राहुरी कृषी विद्यापीठासमोर आंदोलन केले होते. त्यानंतर बुधवारी संबंधितांनी गंगापूर रस्त्यावरील आपल्या महाविद्यालयासमोर हे आंदोलन केले.
सकाळी महाविद्यालय सुरू होण्याच्या वेळी विद्यार्थी प्रवेशद्वारावर जमले. विद्यार्थिनींची संख्या लक्षणिय होती. या बदलामुळे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले असून आपला हक्क हिरावून घेतल्याचा आरोप कोमल शिंदे, शृंखला कांगणे, रविना दराडे, सागर सोनवणे व सुभम पिपोकार यांनी केला. प्रवेशद्वारासमोर ठिय्या देऊन विद्यार्थ्यांनी उपरोक्त निर्णयाचा निषेध केला. जाचक अटी विद्यापीठाने त्वरित रद्द कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.