नागपूर शांतीनगर वसतिगृहात राहणाऱ्या १३० आदिवासी विद्यार्थ्यांना पारडी येथील स्वतंत्र इमारतीत पाठवू नये, या मागणीसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी मंगळवारी गिरीपेठेतील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने केली. शांतीनगरातील वसतिगृहात १३० आदिवासी विद्यार्थी राहत आहेत. पारडी येथे १३० विद्यार्थ्यांची सोय असलेली नवीन इमारत बांधण्यात आली आहे. शांतीनगर वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पारडी येथील नवीन इमारतीत राहण्याचा आदेश दिला आहे. पारडी येथील इमारतीत फक्त १३० विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे. तेथे आणखी १३० विद्यार्थ्यांना पाठवल्यास ही संख्या २६० वर पोहोचणार आहे. त्यामुळे अनेक अडचणी निर्माण होणार आहे. त्याचा परिणाम अभ्यासावर होणार आहे. त्यामुळे पारडी येथे आम्हाला पाठवू नये, एक स्वतंत्र इमारत द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांची होती. या मागणीचे निवेदन सहायक प्रकल्प अधिकारी फुंडे यांना देण्यात आले होते. त्यांनी आश्वासन दिले परंतु त्याची अंमलबजावणी मात्र झाली नाही. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, या मागणीसाठी या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून शांतीनगर वसतिगृहाच्या आवारात उपोषणास सुरुवात केली आहे. तसेच मंगळवारी दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर निदर्शने केली. यानंतर मागणीचे निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष व महापालिकेतील विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनीही या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.