मुंबई विद्यापीठाच्या ऐतिहासिक राजाबाई टॉवरच्या दुरुस्तीच्या कामामुळे त्या इमारतीतील ग्रंथालयात अभ्यास व संशोधनाच्या तयारीकरिता येणाऱ्या पीएचडी, एमफिलच्या विद्यार्थ्यांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
राजाबाई टॉवरच्या इमारतीत असलेल्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके व ग्रंथ आहेत. यातली अनेक पुस्तके इतर कुठेही मिळत नाहीत. त्यामुळे, विद्यार्थ्यांना या ग्रंथालयात येण्याशिवाय पर्याय नसतो. संशोधनाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वतंत्र टेबल मिळते.
एक हजार रुपये भरून एका सत्राकरिता विद्यार्थ्यांना एक टेबल घेता येते. गरज असल्यास ही मुदत वाढविताही येते. असे टेबल मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना १० ते २० पुस्तके घेऊन अभ्यास करता येतो. एकाच वेळी इतकी पुस्तके घेऊन अभ्यास करता यावा यासाठीच ही सोय आहे.
सध्या राजाबाई टॉवरच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. ‘टाटा कन्सल्टन्सी सव्र्हिसेस’च्या (टीसीएस) सहकार्याने सुरू असलेल्या या दुरुस्तीचे काम गेले वर्षभर सुरू आहे.
आणखी सहा महिने हे काम चालेल. यात संपूर्ण इमारतीबरोबरच या ग्रंथालयाचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे, ग्रंथालयात विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता दिली जाणारी टेबले येथून दुसऱ्या एका कक्षात हलविण्यात आली आहेत. पूर्वीच्या जागेत ३८ टेबले राहायची. पण, नवी जागा लहान असल्याने टेबलांची संख्या आता अध्र्यावर आली आहे.  त्यामुळे, अनेक विद्यार्थ्यांना टेबल नाही म्हणून आपले संशोधनकार्य पुढे ढकलावे लागते आहे. गेले वर्षभर हा प्रकार सुरू आहे.

नियमावर बोट ठेवून अडवणूक
काही विद्यार्थ्यांना आपले काम पुढे ढकलणे शक्य नाही. काही विद्यार्थ्यांनी यातून मार्ग काढण्याकरिता ज्यांच्याकडे टेबल आहे त्यांच्या संमतीने एका टेबलावर दोघांना बसण्यास परवानगी द्या, अशी विनंती ग्रंथालयाकडे केली. परंतु, नियमात बसत नाही म्हणून विद्यार्थ्यांना टोलवले जात आहे. ज्यांच्याकडे टेबल आहे त्याचीच हरकत नसेल तर दोघांनी एक टेबल वापरण्यात काय अडचण आहे, असा सवाल एका समाजशास्त्राच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांने केला.
गेले वर्षभर अनेक विद्यार्थी टेबल मिळत नसल्याने हात हलवित परत जात आहेत. नियम तर विद्यार्थ्यांना टेबल द्या, असेही सांगतो. अपुऱ्या संख्येमुळे सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ते देऊ शकत नाही तर किमान दोघांना एक टेबल वापरण्याची तरी परवानगी द्या.
मनोज टेकाडे, अध्यक्ष,
प्रहार विद्यार्थी संघटना