महाविद्यालयीन शिक्षण घेताना केवळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही. प्रात्यक्षिकासह आकलनशक्ती, पुस्तक वाचन, व्यवहारज्ञान, संवाद कौशल्ये विकसित करण्याचे आवाहन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी केले आहे. उद्योजकीय गुण महाविद्यालयीन काळातच आपल्या अंगी रुजविण्यासाठी प्रयत्न करावेत. असा सल्लाही त्यांनी दिला.
नाशिकरोड येथील चांडक-बिटको महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सहकार्याने आयोजित उद्योजकता विकास कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक धनंजय बेळे, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. डी. जी. बेलगावकर, प्रा. एस. जी. देवधर, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन जाधव, प्रा. जयंत भाभे हे या वेळी उपस्थित होते. बेळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सध्या जिल्ह्य़ात ८५०० उद्योग व व्यवसाय सुरू असून आगामी काळात अनेक मोठे उद्योग शहरात येऊ घातले आहेत, त्यामुळे मोठा रोजगार उपलब्ध होणार असल्याने आपण योग्य शिक्षण व व्यवस्थापन, रोजगार शिक्षण व प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. दुपारच्या सत्रात व्यावसायिक सोमनाथ राठी यांनी मार्गदर्शन केले.