ध्येयनिश्चिती, ध्येय गाठण्यासाठीचा कृती आराखडा व त्यानुसार अविरत परिश्रम केल्यानेच यश मिळते. परंतु मिळविलेल्या यशाचा उपयोग समाजासाठी किती करणार आहोत, हे ठरविणेदेखील भावी वाटचालीत महत्त्वाचे आहे, असा कानमंत्र उपजिल्हाधिकारी पदाची परीक्षा अलीकडेच उत्तीर्ण झालेल्या मनीषा दांडगे यांनी दिला.
सम्यक बौद्ध उपासक-उपासिका महासंघाच्या वतीने बहुजन समाजातील दहावी-बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड होते. प्रमुख अतिथी म्हणून वसंतराव नाईक महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक रमेश बनसोड, निवृत्त उत्पादन शुल्क निरीक्षक कैलास कांबळे, डॉ. भारत सोनवणे, डॉ. चेतना सोनकांबळे, केंद्रीय उत्पादन शुल्क व सेवा विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद गोरसे उपस्थित होते. गोरसे म्हणाले, की बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन मोठी अधिकारपदे, मानाचे हुद्दे पादाक्रांत करून त्याद्वारे बहुजनांचा उद्धार करण्याची शपथ घ्यावी.
रोहित खरात, सायली बनसोड, प्रतीक्षा तायडे, समृद्धी खंडारे, अजय डाकोरे, प्रतिभा नरवडे, सिद्धान्त साठे, सुप्रिया बागूल, सुमेध कळासरे, प्रफुल्ल बनसोडे, अविनाश सदाफुले, आरती कबाडे, सुजय कांडलीकर, अभिजित मोहन, जान्हवी शेगावकर, श्रद्धा दांडगे, आकाश मोहन या गुणवंतांचा ग्रंथ, पुष्पगुच्छ व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला.