मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी महाविद्यालयांचे १७० विद्यार्थी १७ गावांमध्ये शेतकऱ्यांना नवीन कृषी तंत्रज्ञानासह पीक व्यवस्थापनाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत. कृषिदूत म्हणून हे विद्यार्थी तंत्रज्ञान प्रसारणासाठी सज्ज झाले आहेत.
परभणी कृषी महाविद्यालयाच्या कृषी पदवीच्या सातव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. एन. डी. पवार होते. परभणी तालुक्यातील निवडलेल्या १७ गावांमध्ये पुढील २० आठवडे जाऊन पदवी अभ्यासक्रमात घेतलेले शेतीविषयक ज्ञान, विद्यापीठाने विकसित केलेले नवीन कृषी तंत्रज्ञान, विविध पिकांच्या जाती, तसेच रोग व कीड नियंत्रण या विषयांबाबत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमामधून पदवीधरांना शेतकऱ्यांचे जीवनमान, शेती पद्धती जवळून पाहण्याची संधी प्राप्त होईल. विद्यापीठाचे कृषी तंत्रज्ञानाचा  शेतकऱ्यांमध्ये कशा पद्धतीने प्रसार करावा, या बाबतच्या कौशल्याची माहिती विद्यार्थ्यांना घेता येईल, असे प्राचार्य डॉ. पवार यांनी सांगितले. कार्यक्रम समन्वयक तथा विभागप्रमुख डॉ. बी. एम. ठोंबरे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. आर. पी. कदम यांनी सूत्रसंचालन केले.