शनिवार-रविवार या दोन दिवसांमध्ये राजकीय पक्षांचा प्रचार सुरू असतानाच मुंबईतील काही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या परीक्षांमधून वेळ काढत मतदान जागृती अभियान राबविले. यामध्ये परळ येथील महर्षी दयानंद महाविद्यालय आघाडीवर होते. महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरातील टाटा कर्करोग रुग्णालय, केईएम रुग्णालय, कामगार मैदान, कीर्ती महल या परिसरात जाऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी अभियान केले. यामध्ये पथनाटय़ांचे सादरीकरण, फलक घेऊन फेरी काढून जागृती करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी येथील विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदान करण्याबाबत जागृती केली होती. मात्र यंदा परीक्षांमुळे त्यांना वेळ मिळत नव्हता. तरीही शनिवार-रविवारची संधी साधत विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून मतदान जागृती अभियान पार पाडल्याचे एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी अविनाश करंडे यांनी सांगितले.