मुंबई विद्यापीठाच्या अनेक परीक्षांचे निकाल लागून महिने झाले तरी गुणपत्रिका न मिळाल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत. कारण आता पुढची म्हणजे एटीकेटीची परीक्षा तोंडावर आली आहे; परंतु गुणपत्रिका नसल्याने नेमक्या कुठल्या विषयात उत्तीर्ण-अनुत्तीर्ण झालो आहोत हे कळायला विद्यार्थ्यांना काहीच मार्ग नाही. परिणामी अस्वस्थतेबरोबरच विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होते आहे.
गेली काही वर्षे विद्यापीठांच्या विविध परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहेत. त्यात केवळ विद्यार्थी उत्तीर्ण की अनुत्तीर्ण इतकेच समजते. निकाल ऑनलाइन जाहीर केला की आपले काम संपले, अशी समजूत जणू काही विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने करून घेतली आहे. कारण पुढल्या सत्राच्या आणि एटीकेटीच्या परीक्षा तोंडावर आली तरी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका त्यांच्या महाविद्यालयात पोचत्या करण्याची तसदी परीक्षा विभागाने घेतलेली नाही. परिणामी निकाल अनुत्तीर्ण असल्यास नेमक्या कुठल्या विषयात दांडी गुल झाली आहे, हे समजायला मार्ग नाही. यामुळे पुनर्परीक्षेकरिता कुठल्या विषयाची तयारी करायची याचा अंदाज विद्यार्थ्यांना येत नाही. आता तर पुढील परीक्षांच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. परंतु निकालपत्र हातात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
‘आमचा निकाल लागून जमाना झाला; परंतु गुणपत्रिका नसल्याने एटीकेटीच्या कुठल्या विषयाची तयारी करायची हे समजायला मार्ग नाही,’ अशा शब्दांत एका बीएस्सीच्या पाचव्या सत्राच्या गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांने सांगितले. बीएस्सीच्या पाचव्या सत्राबरोबरच एमए भाग-१, एलएलएम, बीएच्या गुणपत्रिकाही अद्याप विद्यार्थ्यांना मिळालेल्या नाहीत. त्यांची दुसऱ्या सत्राची परीक्षा महिनाभरावर आली आहे, परंतु कोणत्या विषयात अनुत्तीर्ण आहोत हे समजायला मार्ग नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
‘या वर्षी परीक्षांविषयक गोंधळाचा विद्यापीठाने कहर केला असून तो संपणार तरी कधी? या वर्षी निवडणुकांमुळे विद्यापीठाचे परीक्षांचे वेळापत्रक कोलमडल्याचे कारण सांगितले जात असले तरी पुढल्या सत्राच्या परीक्षा तोंडावर आल्या तरी गुणपत्रिका न देण्याचे कारण काय,’ असा प्रश्न अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केला.