आगामी कुंभमेळा सुरळीत पार पडावा यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. विशेषत: पर्वणी काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जाणार असल्याने काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत शहरातील विविध बस स्थानकांवर सीसी टीव्ही कॅमेरे बसविले जाणार असून कोणत्या स्थानकावर किती कॅमेऱ्यांची गरज आहे याचा अभ्यास पुण्याच्या सीआयआरटी संस्थेमार्फत सुरू आहे. या संदर्भातील अहवाल पुढील महिन्यात आल्यानंतर कामास प्रत्यक्ष चालना मिळेल.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आगामी कुंभमेळा सुरळीत पार पडावा यासाठी केलेले नियोजन अंतिम टप्प्यात आहे. पर्वणी काळात भाविकांची मुख्य भिस्त महामंडळावर राहणार आहे. भाविकांची वाहतूक सुरळीत पार पडावी यासाठी महामंडळ दोन हजार बसेसचा ताफा सज्ज ठेवणार आहे. बाहेरगावाहून येणारी वाहने शहराच्या बाहेर थांबविली जाणार आहेत. त्या भागातून शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी एसटी बसेस हा महत्त्वपूर्ण पर्याय राहील. शहराच्या अंतर्गत आणि बाहय़ विभागात ११ हून अधिक वाहनतळांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यात पुणेरोड ते नाशिक, औरंगाबाद रोड ते नाशिक, मालेगाव रोड ते नाशिक, दिंडोरी रोड ते नाशिक, पेठरोड ते नाशिक, गंगापूर रोड ते नाशिक, सातपूर रोड ते नाशिक, मुंबईरोड ते नाशिक, नाशिक ते त्र्यंबकेश्वर, घोटी ते त्र्यंबकेश्वर आणि जव्हार ते त्र्यंबकेश्वर या मार्गाचा समावेश आहे. पर्वणी काळात भाविकांची संख्या लाखोंच्या घरात जाणार आहे. त्या वेळी गर्दीचा फायदा घेत भुरटय़ा चोऱ्या किंवा अन्य काही गैरप्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावर नियंत्रण राखण्यासाठी मंडळाच्या वतीने विशेष प्रयत्न करण्यात येणार आहे.
शहर परिसरातील १४ बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. यासाठी अंदाजे ५० लाखांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. प्रत्येक बसस्थानकावर सिंहस्थ काळात होणारी संभाव्य गर्दीचा अंदाज बांधून त्या ठिकाणी कोणत्या क्षमतेचे कॅमेरे बसविणे आवश्यक आहेत, त्यांची संख्या किती असावी, स्थानकावर त्यांची जागा कुठे असेल, कॅमेऱ्यांचा नियंत्रण कक्ष याचा स्थानकनिहाय अभ्यास सुरू आहे. या संदर्भात पुणे येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ रोड ट्रान्स्पोर्ट (सीआयआरटी ) संस्था शहर परिसरातील बसस्थानकांचे सव्‍‌र्हेक्षण करत आहे. संस्थेचे पथक लोकसंख्या, बसस्थानकाची गरज आणि वाहतुकीच्या दृष्टीने उपयुक्तता या दृष्टीने अभ्यास करत आहे. या अभ्यासाचा अहवाल पुढील महिन्यात प्राप्त होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. सीसी कॅमेऱ्याबाबत सर्वेक्षण सुरू असले तरी त्यासाठी अद्याप कुठलाही निधी प्राप्त झालेला नाही. नाशिक विभागाने स्वखर्चाने कामाला सुरुवात केली असल्याचे विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांनी सांगितले.