० पाच भाषा शिकण्याची सुविधा
० केंद्र शासनाच्या संस्थेचा उपक्रम
आपल्या मातृभाषेखेरीज अन्य एखाद-दुसरी भाषा आपल्याला बोलता, लिहिता यावी तसेच किमान त्या भाषेत काय बोलले जाते, ते कळावे, असे खूप वाटत असते. पण ते सहजी शक्य होत नाही. कदाचित त्या भाषेचा शिकवणी वर्ग लावून ती शिकता येऊ शकते. अर्थात त्यासाठी आपल्या खिशावर भार पडतो. मात्र, आपल्या खिशावर कोणताही भार न टाकता या भाषा मोफत शिकण्याची ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाली आहे.
केंद्र शासनाच्या ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन लॅग्वेज’ या विभागाने गुजराती, ओरिया, आसामी, बंगाली आणि मराठी या पाच भारतीय प्रादेशिक भाषा ऑनलाइन शिकण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ँ३३स्र्://६६६.्रू’-ीु‘२.ल्ली३/ या संकेतस्थळावर ‘आदर ई-बुक्स’ या नावाने एक विभाग असून त्यावर क्लिक केले की या पाच भारतीय भाषा शिकण्याचे ऑनलाईन दालन समोर येते. या उपक्रमाला भारतीय भाषा ज्योती असे नाव देण्यात आले असून या उपक्रमाचा उद्देश, त्या त्या भाषेतील लिपीचा उच्चार, या पाच भारतीय भाषांमधील संख्या आणि शब्दकोश देण्यात आला आहे.
या पाच भाषा शिकण्यासाठी त्या त्या भाषेतील प्रत्येकी २४ धडे देण्यात आले आहेत. या धडय़ात त्या भाषेतील शब्द, भाषा शिकणाऱ्याला तो शब्द समजावा म्हणून तो शब्द देवनागरी भाषेत दिला असून त्या शब्दाचा उच्चार कसा करायचा, तो देवनागरी भाषेत येथे देण्यात आला आहे. वेगवेगळ्या प्रसंगात कसे बोलायचे, याची संवादात्मक माहिती या सर्व धडय़ातून देण्यात आली आहे. त्यामुळे या धडय़ांवरून काही दिवसातच एखाद्याला या पाचपैकी कोणतीही भाषा शिकणे सहज शक्य होणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत लवकरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषा शिकण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवीन भाषा, त्या भाषेतील शब्द, लिपी आणि ती भाषा शिकण्यासाठीची किमान तयारी यामुळे होणार असल्याचे मत भाषा तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.