फेब्रुवारीपासून कोतवालांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करून नेमणुका झालेल्या ११ कोतवालांच्या नेमणुका शासन अध्यादेशाचा आधार घेऊन तडकाफडकी रद्द करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्हय़ातील भिवंडी, कल्याण, डोंबिवली परिसरातील तलाठी कार्यालयांमध्ये कोतवालांची भरती करण्यासाठी तहसीलदारांनी काही उमेदवारांची लेखी, तोंडी परीक्षा घेतली होती. यशस्वी उमेदवारांना नियुक्ती पत्र देऊन हजर होण्याचे आदेश देण्यात आले होते. काही उमेदवार आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी हजर झाले होते. सरकारी नोकरी मिळाल्याच्या आनंदात असतानाच या उमेदवारांना तुमच्या नियुक्त्या रद्द करण्यात येत असल्याचे पत्र तहसीलदारांनी दिल्याने या उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. सप्टेंबर २०१३ च्या शासन निर्णयानुसार कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी अथवा त्यांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती असावी, असा सुधारित नियम आहे. आताच्या नेमणुका तहसीलदारांनी केल्या आहेत. त्यामुळे या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे उमेदवारांना कळविण्यात आले आहे. भरती प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये सुरू करण्यात आली होती. मग त्या भरती प्रक्रियेला त्याच्या पुढील शासनाचा अध्यादेश कसा लागू होऊ शकतो, असा प्रश्न उमेदवारांनी केला आहे.