News Flash

कल्याणमधील रोहिदासवाडा जलमय

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाई चांगला झाला असल्याचा दावा केला असला तरी शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन

| June 19, 2013 08:51 am

कल्याण डोंबिवली महापालिकेने नालेसफाई चांगला झाला असल्याचा दावा केला असला तरी शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाचे पाणी साचून राहत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कल्याण पश्चिमेतील आंबेडकर रस्त्यालगतच्या रोहिदासवाडा भागात गटाराचे पाणी तुंबत असल्याने या भागातील सुमारे ४०० घरांमध्ये मुसळधार पावसात पाणी शिरत आहे.
कल्याणमधील शिवाजी चौक, बेतुरकरपाडा, चिकणघर, कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी, काटेमानिवली, डोंबिवलीतील रेल्वे स्थानक परिसर, महात्मा फुले रोड, गुप्ते रोड भागात सतत पाणी तुंबलेले असते. या भागातील पाण्याचा निचरा करणे पालिका कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही, असे रहिवाशांनी सांगितले. रोहिदासवाडा भागातील गटारांची सफाई योग्य प्रकारे करण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात येथील गटारे तुंबतात. तुंबलेले गटारांचे पाणी कचरा, घाणीसह घरात घुसते. या भागात मस्जिद, उर्दू शाळा आहे. घाणीच्या पाण्यातून वाट काढत मुले, नागरिकांना जावे लागते. कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक चारमधील सत्यम रूग्णालयाजवळ पालिकेचे गटार तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदलेल्या खडय़ात पडून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष पाटील पाय घसरून पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. ३१ मे पूर्वी गटारे, रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, असे प्रशासनाचे आदेश असताना पावसाळ्यात हे काम सुरू ठेवण्यात आले होते.
 वीजेचा लपंडाव सुरुच
महापालिकेने घरडा सर्कल ते टिळक पुतळा दरम्यान रस्त्यांची कामे केली आहेत. ही कामे करताना अनेक ठिकाणी वीज वाहिन्या खराब झाल्या आहेत. काही ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या आहेत. पावसामुळे या वीज वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याने डोंबिवली शहराच्या काही भागाचा विशेषत: पश्चिम भागाचा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असतो, असे महावितरणच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 8:51 am

Web Title: submerge rohidaswada in kalyan
टॅग : Heavy Rain,Kalyan
Next Stories
1 सामाजिक संस्थांना दिलेल्या भूखंडाचा गैरवापर
2 महागडय़ा पार्किंगमुळे युती धास्तावली
3 सिडकोच्या खांद्यावरून काँग्रेसचा राष्ट्रवादीवर निशाणा
Just Now!
X