* २७६४ कोटींची एकूण गुंतवणूक   
* तीन हजार प्रकल्पांना मंजुरी
‘अॅडव्हांटेज विदर्भ’ औद्योगिक गुंतवणूक परिषदेत वस्त्रोद्योग क्षेत्रात १८८० कोटींचे सामंजस्य करार झाले आहेत. या क्षेत्रात एकूण २७६४ कोटींची गुंतवणूक झाली असून  नव्या उद्योगांना सबसिडी देण्याची घोषणा राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री आसिफ (नसीम) खान यांनी केली.
‘अॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये आयोजित ‘वस्त्रोद्योगातील संधी : विदर्भाची अर्थव्यवस्था ’ या विषयावरील चर्चासत्रात खान बोलत होते. या सत्रात वस्त्रोद्योग खात्याचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, अलोक इंडस्ट्रिज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप जिवराजका, एलपीएस इंडस्ट्रिज लिमिटेडचे अध्यक्ष के.के. अग्रवाल, कोडॅक कोमोडिटीज्चे अध्यक्ष सुरेश कोडक, रेमंड यूसीओ डेनिम प्रा.लि.चे समूह मुख्य व्यवस्थापकीय संचालक एस.के. गुप्ता, श्याम इंडोफॅब प्रा.लि.चे सह व्यवस्थापकीय संचालक संदीप गुप्ता, जीमॅटेक इंडस्ट्रिज प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक प्रशांतकुमार मोहता, राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया उपस्थित होते.
या चर्चासत्रात अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा झाली. कापसाच्या उत्पादनात विदर्भ राज्यात आघाडीवर आहे. नव्या वस्त्रोद्योग धोरणात सिंगल विंडो नाही. विस्तारित प्रकल्पांना सबसिडी दिली जाणार असून याबाबतचा शासकीय आदेश (जी.आर) आठवडाभरात काढण्यात येईल. या क्षेत्रातील गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होणार आहे. एक वर्षांनंतर नव्या धोरणाचा आढावा घेतला जाणार आहे. कापूस उत्पादन असलेल्या भागाला लाभ मिळावा म्हांत सर्व सुविधांसह उपलब्ध आहे. विदर्भासह महाराष्ट्राच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे खान म्हणाले.
चांगल्या ब्रॅण्डला आज किंमत आहे. कापसातील शंकर हा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड आहे. गुजरातचा शंकर तर महाराष्ट्राचा महाशंकर आहे. आपण खास बाबींवर भर द्यावा, असे कोटक म्हणाले. वस्त्रोद्योगात आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. चांगले धोरण आणि त्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मोहता म्हणाले. उत्पादित मालावर त्याच ठिकाणी प्रक्रिया होत नसल्याने वाहतूक खर्च वाढत आहे. हे टाळण्यासाठी कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग विदर्भातच सुरू व्हावे, असे पोरवाल म्हणाले. सरकारने वस्त्रोद्योगावर लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी सबसिडीही दिली जात आहे, असे राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया म्हणाले. या सत्राचे संचालन सुवीन अॅडव्हायझर्स प्रा.लि.चे व्यवस्थापकीय संचालक अविनाश मयेकर यांनी केले.