महागाई, दुष्काळ, बेरोजगारीसह कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या ‘बंद’दरम्यान दुसऱ्या दिवशी संपकऱ्यांच्या संख्येत मोठी वजाबाकी झाल्याचे चित्र होते. क्रांती चौकात आयोजित निदर्शनांमध्ये अंगणवाडी कर्मचारी व आशा कर्मचाऱ्यांची मोठी संख्या होती. मात्र, कालच्या तुलनेत ही संख्या बरीच कमी होती. सरकारी कार्यालयांत बहुतेकांनी हजेरी लावली.
मराठवाडय़ात ‘बंद’ दरम्यान जवळपास सर्व व्यवहार सुरळीत होते. राष्ट्रीयीकृत बँकांचे कामकाज मात्र पूर्ण बंद होते. जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्तालयात बहुतांश कर्मचारी हजर होते. संपात सहभागी आहोत, मात्र कामाचा ताण अधिक असल्याने कार्यालयात आले असल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. ज्या व्यक्ती कार्यालयात आल्या नाही व संपातही सहभागी झाल्या नाहीत, त्यांनी एक दिवसाच्या सुटीचा आनंद घेतला.
कर्मचारी संपावर, रुग्णसेवा वाऱ्यावर..
दोन दिवसीय देशव्यापी संपाचा सरकारी रुग्णालयांतील रुग्णसेवेला मोठा फटका बसला. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात रुग्णांना दाखल करण्यासाठी नातेवाइकांनाच सारे सोपस्कार करावे लागले. त्यांची ही परवड पाहून स्थानिक पोलीसही मदतीला धावले. संपादरम्यान दोन दिवस हेच चित्र पाहावयास मिळाले.