नव्या वेळापत्रकाने प्रवास सोयीचा होण्याऐवजी गैरसोयच अधिक झाल्याची अंबरनाथकरांनी भावना आहे. कारण या नव्या वेळापत्रकात नवीन एकही लोकल वाढली नाहीच, उलट दोन गाडय़ांमधील अंतर वाढवून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
गेल्या काही वर्षांपासून अंबरनाथ शहराची लोकसंख्या वाढू लागली आहे. आनंदनगर औद्योगिक वसाहतीत मोठय़ा कंपन्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे येथील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन सकाळ-संध्याकाळी अनुक्रमे अप तसेच डाऊन मार्गावर अधिक लोकल फेऱ्या सुरू करण्याची प्रवाशांची मागणी होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून सकाळी अंबरनाथहून सुटणाऱ्या दोन लोकल्स नव्या वेळापत्रकात बदलापूरहून सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. अंबरनाथ स्थानकाजवळ रात्री गाडय़ा सायडिंगला ठेवण्याची जागा आहे. बदलापूर स्थानकात ती नाही. त्यामुळे लोकल्स वांगणीला नेऊन ठेवाव्या लागतात. वेळापत्रकातील या बदलामुळे आता सकाळी सहा दहा ते सात पंधरा तसेच पावणेनऊ ते नऊ चव्वेचाळीसदरम्यान अंबरनाथहून सुटणारी एकही लोकल नाही. थोडक्यात ऐन गर्दीच्या वेळात तब्बल एकेक तासाच्या अंतराने अंबरनाथहून सुटणारी गाडी नाही. अंबरनाथ शहराप्रमाणेच उल्हासनगर कॅम्प पाच तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील रहिवासीही या स्थानकातून दररोज प्रवास करीत असतात. मात्र रेल्वे प्रशासनाने ही वस्तुस्थिती लक्षात घेतलेली नाही.

गैरसोयींचे स्थानक
वर्षांकाठी सात ते आठ कोटी रुपये उत्पन्न मिळत असूनही अंबरनाथ स्थानकात सुविधांची वानवा आहे. तीन फलाट मिळून केवळ एकच स्वच्छतागृह आहे. कोणतीही विशेष सुविधा नसल्याने अपंग प्रवाशांची खूपच गैरसोय होते.