येथील कॅनरा बँकेमध्ये सेवेत असलेल्या परप्रांतीय अधिकाऱ्याने बुधवारी गळफास लावून आत्महत्या केली. अभिजित दत्त त्रिपाठी (वय ३१) असे त्याचे नाव आहे. त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशातील फैदाबादचे आहेत. सध्या ते बसंत-बहार चित्रमंदिरासमोर नंदनवन पार्कमधील एका सदनिकेमध्ये एकटेच राहत होते. आज बँकेचे कामकाज सुरू झाल्यावर ते कामावर आले नाहीत. त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे बँकेचे कर्मचारी त्रिपाठी राहात असलेल्या सदनिकेकडे गेले. कर्मचाऱ्यांनी खिडकी उघडून आत डोकावले असता त्रिपाठी यांनी सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळले. याबाबत शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये नोंद झाली आहे.