अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथे तलावात खेळता-खेळता पडल्याने बीड जिल्ह्य़ातील ऊसतोड मजुरांच्या दोन चिमुकल्या मुलांचा(वय ५) अंत झाला. जीवन विजय पवार व सावन भगवान पवार अशी मृत मुलांची नावे आहेत.
यासंदर्भात अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार घोळसगाव येथे शेतक-यांच्या उसाच्या शेतात ऊस तोडण्यासाठी मजुरांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या ऊसतोड मजुरांच्या टोळ्यांसोबत त्यांची मुले राहतात. घोळसगाव येथे ऊसतोडीचे काम सुरू असताना तीन मुले लगतच्या तलावाजवळ खेळत होती. खेळताना ही तिन्ही मुले तलावात गेली. परंतु तोल गेल्याने तिन्ही मुले पाण्यात बुडाली. त्याचवेळी एक ऊसतोड मजुराची पत्नी कपडे धुण्यासाठी तलावाकडे गेली असता एकाच वेळी तीन मुले पाण्यात बुडत असल्याचे दिसून आले. यात तिचा पुतण्या पवन श्रीराम पवार हा देखील पाण्यात बुडत असल्याचे लक्षात आले. तेव्हा या महिलेने धाडसाने पाण्यात उडी मारून पवन यास पाण्यातून बाहेर काढले. मात्र इतर दोन मुलांना वाचविण्यात तिला यश आले नाही.