दक्षिण महाराष्ट्र व मराठवाडय़ात ऊस गाळप करणा-या जवळपास सर्व साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता जाहीर होऊन त्याचे वाटपही केले असताना इकडे राज्यात सर्वाधिक २९ साखर कारखाने असलेल्या सोलापूर जिल्हय़ात मात्र अद्याप उसाचा पहिला हप्ता जाहीर झाला नाही. पहिला हप्ता कधी जाहीर होणार व मिळणार, याबाबतची उत्सुकता ताणली असताना शेवटी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा आंदोलन पेटविण्याचे घोषित करावे लागले. दुस-या टप्प्यातील या आंदोलनाचा भाग म्हणून येत्या २ जानेवारी रोजी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे.
हजारो ऊस उत्पादक शेतक-यांच्या सहभागातून चार हुतात्मा पुतळय़ांपासून निघणा-या या मोर्चाची दखल घेऊन साखर कारखान्यांनी उसाचा २६५० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करून वेळीच दिला नाहीतर आणखी तीव्र आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश सचिव संजय पाटील-घाटणेकर यांनी दिला आहे. उसाच्या पहिल्या हप्त्याच्या मागणीसह सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ तातडीने बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती करावी, जिल्हय़ातील सर्वच शेतक-यांच्या शेतीपंपाचे वीजबिल माफ करावे, माळढोक पक्षी अभयारण्यासाठी आरक्षित केलेल्या शेतक-यांच्या जमिनींची खरेदी-विक्री व कर्जप्रकरणे तातडीने सुरू करावीत या मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार आहे. खासदार राजू शेट्टी व संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत हे या मोर्चाचे नेतृत्व करणार असल्याचे घाटणेकर यांनी सांगितले.
मागील सलग दोन वर्षांच्या दुष्काळामुळे यंदाच्या वर्षी उसाचे क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडून चढय़ा दराने ऊस खरेदी होईल, अशी शेतक-यांची समजूत होती. परंतु याच काळात साखरेचे दर कोसळल्यामुळे साखर उद्योग अडचणीत आला. परिणामी उसाला अपेक्षित वाढीव दर मिळणे अशक्य झाल्याने त्याची झळ ऊस उत्पादक शेतक-यांनाही बसली. तथापि, ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन सुरू केले. हे आंदोलन चांगलेच पेटले असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी अचानकपणे उसाला २६५० रुपये दर मिळण्यास ना हरकत नोंदवत व तडजोड करीत आपले आंदोलन महिनाभर स्थगित केले होते.
दरम्यान, राज्यातील ऊसदराच्या प्रश्नाने पार दिल्लीपर्यंत धडक मारली व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना साकडे घातले. त्यातून केंद्र सरकारने ‘पॅकेज’ जाहीर केले. उसाला प्रतिटन ३३० रुपये जादा दर केंद्राकडून मिळण्याची घोषणा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना करावी लागली. त्याच वेळी इकडे राज्य शासनाकडून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही ऊस खरेदी कर माफ करण्याची घोषणा केली. केंद्र व राज्य सरकारकडून यंदा ऊसदराबाबत सकारात्मक भूमिका जाहीर झाल्याने ऊस उप्तादक शेतकरी सुखावला व त्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या.
तथापि, सोलापूर जिल्हय़ात अद्याप एकाही साखर कारखान्याने उसाचा पहिला हप्ता जाहीर केला नाही व त्यानुसार हप्त्याची रक्कम दिली नाही. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. कोल्हापूर भागात साखर कारखान्यांनी उसाला २२०० रुपयांचा पहिला हप्ता जाहीर करून तो अदा केलादेखील. तसेच मराठवाडय़ातही उसाला पहिला हप्ता १८००रुपयांप्रमाणे मिळाला, परंतु सोलापूर जिल्हय़ात उसाला पहिला हप्ता देण्याबाबत साखर कारखाने ‘शांत’ आहेत.