परभणी-रोजगार हमी योजनेच्या कामाचे पसे न मिळाल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतमजुरांच्या आत्महत्या प्रकरणी केंद्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने राज्याच्या प्रधान सचिवांना संबंधित जिल्ह्यांमध्ये तातडीने विशेष सामाजिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वप्रथम ‘लोकसत्ता’ने २० जुलै २०१३ रोजी शेतमजुरांच्या आत्महत्येचे वृत्त देऊन त्याचा सातत्याने पाठपुरावा केला होता.
‘मग्रारोहयो’च्या कायद्यातील कलम २७(१) अन्वये हे विशेष सामाजिक लेखापरीक्षण होणार आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने राज्याला दिले आहेत. परभणी, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांच्या सर्व ग्रामपंचायतींमध्ये २०१०ते २०१३ या कालावधीतील रोहयो खर्चाबाबतचे हे सामाजिक लेखापरीक्षण असणार असून मजुरी न मिळाल्याच्या तक्रारीभोवती हे परीक्षण असेल. हे सामाजिक लेखापरीक्षण ३१ जानेवारीपूर्वी करण्यात यावे, अशी कालमर्यादाही घालून देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या राज्य सामाजिक लेखा परीक्षण शाखेने तज्ज्ञ समितीच्या निरीक्षणाखाली हे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुकास्तरावर ‘जनसुनवाई’ करण्यात येणार असून या ‘जनसुनवाई’च्यावेळी इतर जिल्ह्यातील तक्रार निवारण अधिकारी राज्य शासनाच्या विशेष आदेशाने देण्यात येतील, असेही या पत्रात नमूद आहे.
‘जनसुनवाई’ झाल्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण निरिक्षणे तक्रार निवारण अधिकारी नोंदवतील. तिथेच चौकशी करतील. त्यांच्यासाठी राज्य शासनाने आवश्यक ते रेकॉर्ड व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे सहसचिव आर. सुब्रमण्यम यांनी राज्याच्या प्रधान सचिवांना दिले आहेत. तक्रार निवारण अधिकारी एक आठवडय़ाच्या आत निकाल जारी करू शकतील. अशा निकाल प्रकरणी सर्व थकीत मजुरी पंधरा दिवसाच्या आत राज्य शासनाने देण्याचे आदेशित करावे. राज्य शासनाने या प्रकरणी मजुरी विलंबास जबाबदार असणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असेही या आदेशात सुचविण्यात आले आहे. शेतमजुरांच्या आत्महत्या झाल्याचे सिद्ध झाल्यास एक लाख रुपये मदत देण्यात यावी. तसेच या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
लोणार तालुक्यातील टीटवी येथील दत्ता माघाडे, प्रल्हाद श्यामजी कोकाटे, चांगुणाबाई गजानन डाखोरे या तीन शेतमजुरांनी रोहयोचे पसे न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्या. टीटवीच्या जवळच असलेल्या गोत्रा या गावी अमृता गोरे, महादू सोनाजी राऊत या दोन शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. एकटय़ा बुलढाणा जिल्ह्यातच या पाच आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी आता थेट केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने राज्य शासनाला आदेश बजावल्याने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.