26 September 2020

News Flash

सुमन काळेच्या मृत्यूची सहा वर्षांनंतर नोंद

पोलिसांची खबरी सुमन काळे हिचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असला तरी तिच्या मृत्यूची नोंद महापालिकेने तब्बल ६ वर्षांनंतर केली.

| June 15, 2013 01:48 am

पोलिसांची खबरी सुमन काळे हिचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला असला तरी तिच्या मृत्यूची नोंद महापालिकेने तब्बल ६ वर्षांनंतर केली. त्यासाठी न्यायालयाचा आदेश कारणीभूत झाला. मनापाने तिच्या मृत्यूची नोंद नुकतीच केल्याने आता तिच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, तिच्या कुटुंबातील ९ सदस्यांनी वारसदार प्रमाणपत्र मिळण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला आहे.
चोरीच्या सोन्याच्या प्रकरणात सुमन काळे हिला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी चौकशीसाठी १४ मे २००७ रोजी ताब्यात घेतले होते. पोलीस अधीक्षक कार्यालयात झालेल्या मारहाणीत ती बेशुद्ध पडली होती. पोलिसांनी तिला सरकारी रुग्णालयात दाखल न करता सावेडीतील खासगी डॉ. दीपक यांच्या रुग्णालयात दाखल केले. १६ मे राजी तिचा रुग्णालयात मृत्यू झाला. पोलिसांनी विषारी औषध प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचा बनाव केला होता, त्यामुळे तिचा भाऊ गिरीश चव्हाण याने पोलिसांच्या मारहाणीतच तिचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधिकारी, शिपाई व डॉ. दीपक अशा एकूण ८ जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. सीआयडीने तपास करून न्यायालयात पूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे.
दरम्यानच्या काळात गेल्या वर्षी मानवी हक्क आयोगाच्या नवी दिल्लीतील कार्यालयाने सुमन काळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याने तिच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसे पत्र पोलीस महासंचालकांनी दिले.
परंतु वारस प्रमाणपत्रासाठी तिच्या मृत्यूची नोंद आवश्यक होती, सुमनचा भाऊ गिरीश व मुलगा साहेबा दोघे मनपाच्या जन्म-मृत्यू नोंद विभागात गेले असता पोलीस किंवा दीपक रुग्णालयाने माहिती न दिल्याने नोंद केली नाही, त्यांनी माहिती दिल्याशिवाय नोंद करता येणार नाही, असे कळवले. गिरीश व साहेबा यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली मात्र त्यांना उत्तर मिळाले नाही. त्यामुळे मुख्य न्यायदंडाधिका-यांकडे वकील योहान मकासरे व वकील एस. पी. गायकवाड यांच्यामार्फत अर्ज दाखल करुन नोंद करण्याची व निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल डॉ. दीपक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. याच सुनावणीत डॉ.दीपक रुग्णालयाने येथेच तिचा मृत्यू झाल्याने नोंद करण्यास हरकत नाही, असे म्हणणे सादर केले. मुख्य न्यायदंडाधिका-यांनी सुमन काळेच्या मृत्यूची नोंद करा, असा आदेश दिला. मात्र डॉ. दीपक यांच्यावरील कारवाईची मागणी नाकारली.
न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाने सुमन काळेच्या मृत्यूची नोंद मार्च २०१३ मध्ये केली. त्यामुळे तिचे  कायदेशीर वारस असल्याचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी तिचा पती गजानन, मुले साहेबा, समाधान, विजय व अजय तसेच मुली कोयना, असीदा, रवीना व काजल अशा ९ जणांनी न्यायालयात अर्ज सादर केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:48 am

Web Title: suman kales death registered after 6 years
Next Stories
1 सत्ताधीशांकडून समाजाची शक्तिस्थाने मोडण्याचे पाप सुरू – उंडाळकर
2 टोलविरोधी आंदोलनात आता ‘महावितरण’चे कर्मचारीही
3 राजमोती लॉन्सवर ‘फुल अ‍ॅन्ड फायनल’ कारवाई
Just Now!
X