अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठात संगणकीय शाखेत एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमात येथील सुमित कुक्कर हा विद्यार्थी प्रथम आल्याने सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
येथील नगरपालिकेतील सेवानिवृत्त अधिकारी भालचंद्रसा कुक्कर यांचा सुमित हा मुलगा असून महाविद्यालयांतर्गत होणाऱ्या मुलाखतींद्वारे अमेरिकेतील टेक्सास येथे संगणक शाखेत एम.एस. या अभ्यासक्रमासाठी दोन वर्षांपूर्वी त्याची निवड झाली होती. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून पदवी घेऊन येवल्यासारख्या ग्रामीण भागातून सुमित अमेरिकेला गेला. टेक्सास विश्वविद्यालयात अभ्यासक्रम पूर्ण करून ३०० विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवीत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. सुमितने येथील माजी प्राचार्य प्र. सा. पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी मुक्तानंद विद्यालयात शिक्षणाचे धडे घेतले आहेत. १२ वी विज्ञान शाखेत येवला तालुक्यात प्रथम, पुण्यातही एमआयटीमध्ये प्रथम अशी त्याची चढती कामगिरी राहिली आहे.