मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल शिक्षण विभागातर्फे लहान मुलांसाठी सुट्टीतील अनेकविध कार्यशाळांचे आयोजत करण्यात आले असून १९ छंदवर्ग व शैक्षणिक कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहेत.
लहान मुलांचा उल्लेख नेहमीच ‘मोडतोड कंपनी’ म्हणून केला जातो. या मोडतोड कंपूला स्वयंचलित साधने तयार करण्यासाठी प्राथमिक किंवा मूलभूत अशी रोबोटिक्सची धमाल, ज्यात शेवटी तयार झालेल्या यंत्रांची स्पर्धा, कुस्त्या असणार आहेत, निसर्गातील प्राणी, पक्षी, साप, फुलपाखरं यांची गमतीजमतींची माहिती, विदेशी पक्षी पाळले तर त्यांची काळजी कशी घ्यायची, घरात मत्स्यालय ठेवलं तर ते आपलं आपण कसं सजवायचं, मासे मरू न देता त्यांना कसं राखायचं, अवतीभोवतीच्या झाडांची ओळख कशी करून घ्यायची, एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्या विषयांमधल्या आगळ्यावेगळ्या गमती, जादू शिकून मित्रमत्रिणींना खूष करण्याची, शाळेत कार्यक्रम देण्याची, विज्ञाननिष्ठ होण्याची संधी, आकाशातील ग्रहगोलांची, ताऱ्यांची ओळख, कागद फाडण्यापेक्षा ते दुमडून त्यातून वेगवेगळ्या आकृत्या करायला शिकवणारी ओरिगामी कला, मातीत खेळताखेळता मातीला आकार देऊन काहीतरी घडवण्याची संधी, रंगीबेरंगी दगड नेमके तसे रंगीत कां होतात, मोहंजोदरो हराप्पा वगरे प्राचीन संस्कृतींच्याबरोबर आणखी कायकाय प्राचीन असतं, ते कसं शोधायचं, कसं ओळखायचं, कॉम्प्युटरवर खेळ खेळताखेळता वेबपेज किंवा ब्लॉगचं डिझाइन कसं करायचं, कोणत्या रसायनात काय घातलं की काय होतं हे समजून घेणं अशा अनेक संधी या कार्यक्रमांतून मिळतील. बहि:शाल शिक्षण विभागात आता एमएससीआयटीचा अभ्यासक्रम शिकायचीही सोय आहे. त्याचा लाभ मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही घेता येईल. पालकांसाठी एक समुपदेशनाचे गप्पासत्रही होणार आहे.
विद्यापीठाचा नयनरम्य परिसर, सुरक्षित वातावरण, हे सुध्दा फायदे आहेतच. या सर्व अभ्यासक्रमांची फी अगदी सहज परवडण्यासारखी आहे. बरेचसे कार्यक्रम एकमेकांना छेद देत नसल्यामुळे एकाहून अधिक कार्यक्रमांत भाग घेणेही शक्य आहे. दहा वर्षांपासून पुढल्या वयाच्या मुलांसाठी काही कार्यक्रम आहेत आणि बारा वर्षांपासून पुढच्या मुलांसाठी तर सर्वच कार्यक्रम योग्य आहेत. अधिक माहितीसाठी २६५४३०११ किंवा २६५३०२६६ या दूरध्वनीवर बोला. कार्यक्रमांचे तपशील जाणून घेण्यासाठी http://www.extramural.org किंवा http://www.extramural.org   वर भेट द्या.