विज्ञानासारखा विषय फक्त पाठय़पुस्तक वाचून पूर्णत: समजावून घेता येत नाही. पुस्तकी ज्ञानासोबत प्रात्यक्षिकांची आवश्यकता असते. प्रयोगशाळेत आणि बाहेरील विश्वाचे निरीक्षण, आकलन व प्रत्यक्ष कृतीतून विज्ञानाची अनुभूती घ्यावी. विज्ञानाच्या शिक्षणातून जिज्ञासा, निरीक्षण क्षमता, प्रयोगशीलता, सृजनशीलता व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, यासाठी शालेय शिक्षणासोबत प्रायोगिक विज्ञानाचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे. या उद्देशाने येथे ‘संडे सायन्स स्कूल’ दोन वर्षांपासून सुरू करण्यात आले असून, रविवारपासून नाशिकसह भारतातील ४० ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. या वर्षांपासून तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनाही या शाळेत सामावून घेण्यात येणार आहे.
शहरात नाशिक, नाशिकरोड व इंदिरानगर येथे या स्कूलची मागील दोन वर्षांपासून सुरुवात झाली आहे. यंदापासून नाशिक सोबतचे संपूर्ण भारतात ४० ठिकाणी संडे सायन्स स्कूलचे आयोजन केले जाणार आहे. विज्ञानमध्ये १०० पैकी १०० गुण मिळविणारे सर्व विद्यार्थी वैज्ञानिक का होऊ शकत नाहीत, गणित, विज्ञानात पैकीच्या पैकी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी खरोखर हा विषय आत्मसात केलेला असतो का, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर हे विद्यार्थी त्यांच्या क्षेत्रात यशस्वी होतात का, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक या आपआपल्या क्षेत्रात संशोधन व विकासाचे कार्य हे विद्यार्थी करू शकतात का, राष्ट्रीय स्तरावर अशा प्रश्नांची उत्तरे अजूनही होकारार्थी आलेली नाहीत. भारतात होणाऱ्या संशोधनाचे प्रमाण व गुणवत्ता वाढण्याची आवश्यकता आहे. यासाठी फक्त शालेय परीक्षेत गुण मिळविणे पुरेसे नाही, तर त्यापेक्षा विषय आत्मसात करणे, पूर्णत: समजावून घेणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठीच संडे सायन्स स्कूलची सुरुवात केली गेली आहे.
संडे सायन्स स्कूल म्हणजेच दर रविवारी भरणारी विज्ञानाची कार्यशाळा. विज्ञानातील मजेदार प्रयोग व प्रकल्प बनवून धमाल करण्याची ही शाळा. विज्ञान प्रबोधिनीतर्फे नाशिकमध्ये दोन वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.
दर रविवारी फक्त दोन तास ही शाळा भरते. पाठय़पुस्तकात शिकलेले विज्ञान प्रत्यक्षात कसे आणायचे, विविध वैज्ञानिक सिद्धांत, नियम स्वत: प्रयोग करून समजून घ्यायचे, त्यावर आधारित प्रकल्प तयार करायचे. अशा प्रकारे प्रात्यक्षिकांद्वारे स्वयंकृतीने हसत-खेळत विज्ञान शिकविणारी ही शाळा आहे. या शाळेत ऊर्जा, पर्यावरण, वीज, अंतराळशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विषयंवर आधारित ५० पेक्षा अधिक प्रयोग व प्रकल्प शिकविले जातील. इयत्ता तिसरी ते नववीचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. प्रयोगांसाठी लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना दिले जाते. तयार होणारे सर्व प्रकल्प विद्यार्थी घरी घेऊन जाऊ शकतात. वर्षांच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या घरातच प्रयोगशाळा तयार होईल एवढे साहित्य त्यांच्याकडे असते.
वाहत्या पाण्यापासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेवर चालणारी कार, हायड्रॉलिक आर्म,  
वातकुक्कुट यंत्र, पर्जन्यमापी, बॅरोमीटर बनविणे, ज्वालामुखी, रसायनांच्या साहाय्याने वायुनिर्मिती, मजेशीर रासायनिक प्रयोग, विद्युत घट बनविणे, मायक्रोस्कोपच्या साहाय्याने सूक्ष्म जगाचा अभ्यास करणे, टेलिस्कोपच्या साहाय्याने आकाश निरीक्षण, सूर्यमालेची प्रतिकृती, आर्यभट्ट व इतर उपग्रहांच्या प्रतिकृती बनविणे याशिवाय बरेच काही या कार्यशाळेत शिकविले जाणार आहे. दुसऱ्या श्रेणीत जाणारे विद्यार्थी ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम, रोबोटिक्स, सूक्ष्म जगाचा अभ्यास, प्रकाशशास्त्र, दैनंदिन जीवनातील रसायनशास्त्र, पर्यावरण या विषयांचा अभ्यास करतील. प्रायोगिक शिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती, आकलन क्षमता, प्रयोगशीलता आदी गुण विकसित होण्यास मदत होईल. कोणत्याही शालेय अथवा स्पर्धा परीक्षेचे उद्दिष्टय़े डोळ्यांसमोर न ठेवता फक्त विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासासाठी हा अभ्यासक्रम विकसित केला गेला आहे.
विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ होऊन वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा हाच संडे सायन्स स्कूलचा उद्देश आहे. अधिक माहितीसाठी ९८२३११४७७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.