सावनेर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील केदार यांच्या विरोधात सर्वच उमेदवार एकवटल्याचे दिसून येत असतानाच भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने केदार मात्र चांगलेच अडचणीत आले आहेत. सोनबा मुसळे यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूतीची लाट सेनेचे जीवतोडे यांच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.
महाराष्ट्रात भाजपच्या उमेदवाराविरुद्ध सेनेचे उमेदवार रिंगणात असताना सावनेरमध्ये मात्र भाजपपुढे धर्मसंकट उभे ठाकले आहे. भाजपचे उमेदवार सोनबा मुसळे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्दबातल ठरवल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली, परंतु त्यांना तेथेही दिलासा मिळाला नाही. भाजपने डमी उमेदवारही उभा केला नव्हता. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचा उमेदवार रिंगणात नाही. यानंतर कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, यावरून भाजपमध्ये विचारमंथन झाले. शिवसेनेचे नेतृत्व भाजपवर तोंडसुख घेत असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ नये, असा एक मतप्रवाह पक्षात होता. भूमिका जाहीर केली नाही, तर आपले परंपरागत शत्रू सुनील केदार यांनाच त्याचा लाभ होऊ शकतो, असा तर्कही दिला जाऊ लागला.
अशा स्थितीत शिवसेनेचे उमेदवार विनोद जीवतोडे यांनाच पाठिंबा द्यावा, अशी गळ या मतदारसंघातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांपुढे मांडली. यानंतर गेल्या चार दिवसांपूर्वीच भाजपने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे जाहीर केल्याने सर्व भाजपचे कार्यकर्ते जीवतोडे यांचा प्रचार करू लागले. जीवतोडे यांच्या प्रचारसभांना मतदारांची प्रचंड गर्दी झाली होती. राष्ट्रवादीचे किशोर चौधरी हे सुद्धा केदार यांच्याच विरोधात बोलत आहेत. त्यामुळे चौधरींना मिळणारी मते जीवतोडे यांच्याच पथ्यावर पडण्याची शक्यता आहे. सावनेर मतदारसंघात सावनेर, कळमेश्वर, मोहपा आणि खापा या चार नगरपरिषदा येतात. यातील सावनेर आणि मोहपा या दोन नगरपरिषदा विरोधकांच्या हातात आहेत. सावनेर नगरपरिषदेला तर केदार यांच्या हेकेखोरीमुळे अध्यक्षच नव्हता. शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अध्यक्ष मिळाला. त्यामुळे सावनेर शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात केदार यांच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. गुंडगिरीच्या भरवशावर सत्ता स्थापन करत असल्याचा आरोपही त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे ‘अभी नही तो कभी नही’ या न्यायाने केदार यांना पछाडण्यासाठी सर्वच विरोधक एकवटले आहेत. त्यातच सोनबा मुसळे यांचा अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांच्याविषयी संपूर्ण मतदारसंघातच सहानुभूतीची लाट निर्माण झाली आहे. त्यातच भाजपचे संघटनही सेनेचे जीवतोडे यांच्यासाठी जीव ओतून काम करत असल्याने जीवतोडे मुंबई गाठणार, अशी चर्चा सुरू झाली आहे, परंतु पराभवाची स्थिती विजयात रूपांतरित करण्यात पटाईत असलेले केदार मंगळवारच्या रात्री कोणती चाल खेळतात, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.