कोल्हापूर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीच्या सुनीता राऊत तर उपमहापौरपदी काँग्रेसचे मोहन गोंजारी यांची वर्णी लागणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. या निवडीवर २ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या विशेष बैठकीत शिक्कामोर्तब होणार आहे. महापौर व उपमहापौर यांचा कालावधी संपल्याने नव्या निवडीसाठी गेल्या महिनाभरापासून नगरसेवकांच्या हालचाली सुरू होत्या. काँग्रेसच्या महापौराची मुदत संपल्याने तेथे राष्ट्रवादीला स्थान मिळणार आहे. शुक्रवारी कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या मुलाखती घेतल्यानंतर महापौरपदासाठी सुनीता राऊत यांचे नाव निश्चित केले. याशिवाय परिवहन समिती सभापतिपदासाठी वसंत कोगेकर, महिला बालकल्याण सभापतीसाठी रोहिणी काटे,  उपसभापतिपदासाठी लीला धुमाळ यांच्या नावाची त्यांनी निश्चिती केली.    
दरम्यान काँग्रेसचे नेते गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी उपमहापौरपदासाठी मोहन गोंजारी यांच्या नावाची घोषणा केली. स्थायी समिती सभापतिपदावरून वाद रंगला असताना आणि या पदाची चुरस वाढलीअसताना तेथे सचिन चव्हाण यांनी बाजी मारली. या नावाला सतेज पाटील यांनी हिरवा कंदील दर्शविल्याने राजू घोरपडे यांचे नाव मागे पडले. ज्यांच्या निवडीवर एकमत झाले अशा सर्वानी शुक्रवारी सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केले. प्रत्येक पदासाठी एकच अर्ज असल्याने निवडीची केवळ औपचारिकता उरली आहे.