20 November 2017

News Flash

सनी लिओनी सिद्धिविनायकाच्या दारी..

साखरझोपेत भल्याभल्यांच्या स्वप्नात तरळणारी सनी लिओनी मंगळवारी पहाटे स्वतची झोपमोड करून प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला

प्रतिनिधी, मुंबई | Updated: January 16, 2013 12:11 PM

साखरझोपेत भल्याभल्यांच्या स्वप्नात तरळणारी सनी लिओनी मंगळवारी पहाटे स्वतची झोपमोड करून प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या दर्शनाला हजर राहिली. गेल्याच आठवडय़ात सनी लिओनी गर्भवती असल्याचा एक व्हिडिओ इंटरनेटवरून प्रसारित झाला होता. त्यामुळे आता होणाऱ्या बाळाच्या सुदृढ तब्बेतीसाठी सनी गणपती बाप्पाला साकडे घालायला आली की काय, असा विचार तिच्या असंख्य चाहत्यांच्या मनात आला. मात्र ती बाळाच्या तब्बेतीसाठी नाही, तर ‘रागिणी एमएमएस-२’च्या यशासाठी साकडे घालायला आल्याचे स्पष्ट झाले. आणि सनीच्या गरोदरपणाच्या गॉसिपवर पडदा पडला. या वेळी तिच्यासह एकता कपूरही हजर होती.
गेल्या आठवडय़ात जुही परमार या अभिनेत्रीच्या घरी असलेल्या एका समारंभात सनीने गरोदर बाईचा पेहराव करत सगळ्यांची जबरदस्त करमणूक केली होती. मात्र त्या समारंभातील काहींनी या प्रसंगाचा व्हिडिओ काढून तो इंटरनेटवर टाकला. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी सगळीकडे चर्चेला उधाण आले. सनी खरोखरीच गरोदर आहे का, या चिंतेने असंख्यांना ग्रासले. अनेकजणांनी इंटरनेटवरूनबातमीची शहानिशा करण्यासाठी जग पालथे घातले, पण सगळीकडे हेच प्रश्नचिन्ह दिसत होते. मग या चर्चेला आणखीनच उधाण आले. त्यातच मंगळवारी पहाटे पहाटे सनी सिद्धिविनायक मंदिरात आल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. सनी नक्कीच आपल्या बाळाच्या सुदृढ प्रकृतीसाठी प्रार्थना करण्यासाठी आली असावी, अशी चर्चा तिच्या भक्तांमध्ये सुरू झाली, आणि आपल्या या स्वप्नसुंदरीला प्रत्यक्ष, याचि डोळा पाहिल्यानंतर या बातमीला अर्थ नाही हे समजल्याने अनेकांनी निश्वास टाकला. सनीने गरोदर बाईचा केवळ पेहराव केला होता, हे कळल्यानंतर अनेकांना हायसे झाले. पुन्हा साखरझोपेच्या स्वप्नांवर सनी स्वार होऊ लागली.. त्या दिवशी सिद्धिविनायकाला सनी कोणते साकडे घालणार हे मात्र तोपर्यंतदेखील गुलदस्त्यातच होते. त्यातच, सनी लिओनीबरोबर एकता कपूर दिसल्यानंतर अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडल्या. अखेर सनी गॉसिपला जन्म देणाऱ्या त्या बाळासाठी नव्हे, तर ‘रागिणी एमएमएस-२’ या आपल्या नव्या चित्रपटासाठी सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेण्यासाठी आली होती, असे निष्पन्न झाले. मग अन्य अनेक भाविकांप्रमाणे एकता आणि सनी या दोघीही सिद्धिविनायकाच्या काकड आरतीतही सहभागी झाल्या. त्या मंदिराबाहेर पडल्या, आणि भाविकांमध्ये  ‘करून करून भागली..’ अशा आशयाची कुजबूज सुरू झाली. सनीच्या सिद्धिविनायक दर्शनाचे नवे गॉसिप जन्माला येण्याआधीच शमले होते..

First Published on January 16, 2013 12:11 pm

Web Title: sunny leone at siddhivinayak temple